अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्याला हादरून टाकणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचे रहस्य उलगडण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. धक्कादायक म्हणजे पैसे आणि दागिन्यांच्या मोहातून हे हत्याकांड केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
याबाबत सविस्तर व्रृत असे कि २४ जानेवारी रोजी शेवगाव शहरातील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एका 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता या मृतदेहाचे मुंडकेच कोणीतरी कापून घेवून गेले होते.
‘त्या’ महिलेचे शिर शोधत असतांना आणखी एक मुलाचा मृतदेह मिळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. या दुहेरी हत्याकांडानंतर पोलिस अधिक्षक मनोज पाटील,
अतिरिक्त पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांनी शेवगावमध्ये दाखल होऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांना तपासकामी सूचना दिल्या होत्या. दरम्यान, आरोपीच्या शोधासाठी नाशिक, औरंगाबाद तसेच मध्यप्रदेश येथे वेगवेगळे पथक रवाना करण्यात आले.
पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी शेवगाव, पाथर्डी येथे विविध ठिकाणी संबंधित महिला आणि मुलाच्या संदर्भात चौकशी केली.
याचवेळी मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मयत मुलगा आणि त्याच्या सोबत एक इसम फिरत असल्याचे चित्रीकरण पोलिसांना मिळाले होते.
त्यानंतर तपास करत औरंगाबाद जिल्ह्यातून नेकपालसिंग पोटीयासिंग चितोडिया यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्याकांडाची कबुली दिली आहे.
प्राथमिक तपासात सदर मृत महिलेच्या जवळील चांदीचे दागिने आणि पैशासाठी ‘त्या’ दोघांना मारल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.