नेवासा : वर्षभरापूर्वी प्रियसीच्या पतीचा खून केल्यानंतर तो पचला असतानाच तिच्या नात्यातील महिलेला याबाबत कुणकूण लागली. सदर महिलेने या दोघांना ब्लॅकमेलिंग करत पैशांची मागणी केली.
तिचा वाढणारा तगादा आणि पहिल्या खूनाचे बिंग फुटण्याच्या भितीने आरोपी अमीन रज्जाक पठाण याने ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा काटा काढला. जोगेश्वरी – वाळुंज रस्त्यावर खून करून मृतदेह नेवासा तालुक्यातील जवळे खुर्द शिवारात टाकून दिला.
परंतु, नेवासा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत शिताफीने तपास करीत दोन्ही खुनांचा उलगडा केला. तसेच श्रीरामपूर सायबर सेलच्या मदतीने चार आरोपींना २४ तासांत ताब्यात घेतले.
अमिन पठाण (वय ३५, रा. बोलठाण, ता. गंगापूर), रतन छबुराव थोरात (वय २८, रा.तांदुळवाडी, ता. गंगापूर), सोनाली सुखदेव थोरात (वय २२, रा. तांदुळवाडी, ता. गंगापूर), राजू भाऊसाहेब उघाडे (वय ५०, रा. गिडेगाव, ता. नेवासा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
एकजण पसार आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : अमिन पठाण याचे सुखदेव थोरात याच्याबरोबर मैत्रीचे संबंध होते. या मैत्रीतून अमिनचे सुखदेवची पत्नी सोनाली बरोबर ओळख झाली. ओळखीतून दोघात पुढे अनैतिक संबंध निर्माण झाले.
हा प्रकार सुखदेवला समजल्यावर दोघांत वाद झाले. अमिन व सोनाली यांच्यात सुखदेव अडसर ठरू लागला. त्यामुळे प्रियकर अमिनच्या मदतीने दि. ११ नोव्हेंबर २०१८ रोजी सोनालीने पती सुखदेवचा गंगापूर भागातच गळा आवळून खून केला व मृतदेह कोपरगाव शिवारात नेवून टाकला.
गंगापूर पोलिसांत तो बेपत्ता असल्याची नोंद केली. त्याचा मोबाइल मात्र पत्नी सोनाली वापरत होती. अमिन व सोनाली यांनी सुखदेवला मारल्याची कुणकूण सोनालीच्या नात्यातील मंगल दुसिंग (वय ३५) हिला लागली.
ती खुनाचे बिंग फोडण्याची धमकी देवून पैशांसाठी दोघांनाही ब्लॅकमेल करू लागली. तिच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अमिन व सोनालीने तिचा काटा काढण्याचे ठरविले. शनिवारी (दि. ७ डिसेंबर) जोगेश्वरी-वाळुंज रस्त्यावर अमिन व सोनाली यांनी रतन थोरात, राजू उघाडे व आणखी एकाच्या मदतीने गळा दाबून मंगलचा खून केला.
खून औरंगाबाद जिल्ह्यात करायचा व मृतदेह लगतच्या नगर जिल्ह्यात आणून टाकायचा हा फंडा सुखदेवच्या खूनापासून आरोपींच्या चांगलाच पचनी पडला होता.
त्यामुळे मंगलचा मृतदेहही रविवारी (दि. ८) त्यांनी जवळे खुर्द (ता. नेवासा) शिवारात कॅनॉल लगत आणून टाकला. बेवारस मृतदेहाला नेवासा पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासाची चक्रे फिरवत एक नव्हे दोेन खून प्रकरणांचा उलघडा केला.
तसेच श्रीरामपूर सायबर सेलच्या माध्यमातून चार आरोपींना २४ तासांत जेरबंद केले.