अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात साधा कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे मात्र मृत्यूचे थैमान अद्यापही थांबायला तयार नाही.
मंगळवारी 48 तासात तब्बल 99 जणांचे प्राण कोरोनाने घेतले आहेत. त्यामुळे मृत्यूचे एकूण प्रमाण तीन हजार 272 एवढे झाले आहे. तसेच बरे झालेल्या रूग्णांची संख्या दोन लाख 49 हजार 996 झाली आहे. उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या दहा हजार 19 एवढी आहे.
मंगळवारी रूग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 94.95 टक्के इतके झाले आहे. सुरूवातीला धडकी भरविणारा आकडा देणार्या नगर शहरातील रूग्णवाढ मात्र बर्यापैकी कमी होऊ लागली आहे. मंगळवारी प्रतिदिन असलेली ही रूग्णवाढ 50 च्या खाली आली होती.
एक जूनपासून जिल्ह्यात अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने गेल्या महिना-दीड महिन्यांपासून बंद असलेली किराणा दुकाने, भाजी विक्री, तसेच काही दिवसांपासून बंद असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांना वेळेची मर्यादा राखून व्यवहार करण्यास मंजुरी दिली आहे.
तसेच ठोक विक्रेत्यांनाही परवानगी दिली आहे. रूग्णवाढ कमी होत असल्याने दिलासादायक वातावरण असले तरी मृतांच्या आकड्यात मात्र कमी होताना दिसत नाही.
प्रतिदिन जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण अंगावर शहारे आणणारे आहे. सोमवारी जिल्ह्यात 45 तर मंगळवारी 54 कोरोना बाधितांना प्राण गमवावे लागले. म्हणजे मंगळवारी संपलेल्या 48 तासांत तब्बल 99 जणांचा मृत्यू झाला आहे.