अहमदनगर ब्रेकिंग : फोन पे वरुन लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : कर्जफेड करण्यास मुदत दिली, जमिनीवरील जप्ती व लिलाव होऊ दिला नाही, या मोबदल्यात तक्रारदाराकडून ७ हजाराची लाच स्वीकारताना नगर तालुका पतसंस्था फेडरेशनचे विशेष वसुली व विक्रीकर अधिकारी यासीन नासर अरब (वय ४२) यास रंगेहाथ पकडण्यात आले.

विशेष म्हणजे ही लाच अधिकाऱ्याने रोख स्वरुपात न स्वीकारता फोन पे द्वारे स्वीकारली. आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगर कार्यालयाने कारवाई केली. कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध १५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अॅन्टी करप्शनच्या अधिकृत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भोरवाडी (ता. नगर) येथील तक्रारदाराने २०१६ मध्ये केडगाव येथील भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतून ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

त्यावेळी तक्रारदाराने आई व मामाच्या नावे असलेल्या शेतीचे उतारे तारण म्हणून दिले होते. तक्रारदाराला कर्ज फेडण्यासाठी ५ वर्षांची मुदत देण्यात आली होती. मात्र तक्रारदार वेळे कर्ज फेडू शकले नाहीत.

या प्रकरणी भैरवनाथ पतसंस्था व फेडरेशनकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. याबाबत २५ मे २०२३ रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. तक्रारदाराने विशेष वसुली अधिकारी यासीन नासर अरब यांच्याकडे २ महिन्यांची मुदत मागितली होती.

मुदतफेडीसाठी २३ ऑगस्ट रोजी १ हजार रुपयांची फी मागण्यात आली. तक्रारदाराने फी फोन पे वर भरली. त्याची पावती देण्यात आली नाही. तद्नंतर ३१ ऑगस्ट २०२३ रोजी भैरवनाथ पतसंसस्थेचे कर्जफेड केले असता कर्ज नील चा दाखला तक्रारदाराला मिळाला होता.

त्यानंतर ४ ते ८ सप्टेंबर दरम्यान यासीन अरब याने ३० हजाराच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २० हजाराची लाच देण्याचे मान्य केले. पहिला हप्ता ७ हजार तर दुसरा हप्ता १३ हजारांचा ठरविण्यात आला होता. दरम्यान तक्रारदाराने या प्रकरणी अॅन्टी करप्शन तक्रार केली होती.

८ सप्टेंबर रोजी अॅन्टी कराशन विभागाने सापळाही रचला होता. मात्र, तक्रारदाराकडून लाच स्वीकारण्यात आली नाही. ती लाच १५ सप्टेंबर रोजी फोन पे द्वारे स्वीकारण्यात आली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रविण लोखंडे, पोनि. शरद गोर्डे, सहाय्यक सापळा अधिकारी राजू आल्हाट, रमेश चौधरी, रविंद्र निमसे, सचिन सुद्रिक, वैभव पांढरे, बाबासाहेब कन्हाड, हरुण शेख, दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.