Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्याच्या आदेशास कोर्टाने स्थगिती दिली आहे.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर व्ही. यार्लगड्डा यांच्या कोर्टाने मंगळवारी (दि. १२) हा आदेश पारित केला आहे. पुढील सुनावणी ५ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती अॅड. भूषण बऱ्हाटे यांनी बोलताना दिली.
माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावतीने कोर्टात अॅड. बऱ्हाटे यांनी काम पाहिले. दरम्यान, कोर्टाच्या या आदेशामुळे कर्डिलेंसह इतरांना दिलासा मिळाला आहे.
बुऱ्हाणनगर (ता. नगर) येथील अॅड. अभिषेक विजय भगत यांनी दाखल केलेल्या खासगी फिर्यादीनुसार अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी माया देशमुख यांनी कर्डिले पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश ८ सप्टेंबर रोजी दिला होता.
भगत यांना कर्डिले यांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती, अशी तक्रार फिर्यादीची होती. या प्रकरणी भगत यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार अर्जही दाखल केला होता. मात्र तेथे कारवाई न झाल्यामुळे भगत यांनी कोर्टात खासगी फिर्याद दिली होती.
त्यावर प्राथमिक सुनावणी होवून न्यायालयाने कर्डिले पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध कर्डिले यांच्यावतीने अॅड. भूषण बऱ्हाटे यांनी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर व्ही. यार्लगड्डा यांच्या कोर्टात फौजदारी पुनरिक्षण अर्ज दाखल केला होता.
त्या अर्जावर सुनावणी होवून कोर्टाने शिवाजी कर्डिले व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या आदेशास स्थगिती दिली आहे.
अॅड. बऱ्हाटे यांनी कोर्टासमोर प्रभावीपणे तीन मुद्दे मांडले. अॅड. बऱ्हाटे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन कोर्टाने शिवाजी कर्डिले, अक्षय कर्डिले यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
तसेच ही स्थगिती कायम करण्यात का येवू नये ? अशा प्रकारची नोटिसही संबंधितांना जारी केली आहे. त्याचप्रमाणे गुन्हा दाखल न करण्याचा आदेश कोतवाली पोलिस ठाण्यालाही जारी केला आहे. अॅड. बऱ्हाटे यांना अॅड. नितीन अकोलकर व अॅड. पल्लवी सुपेकर यांना सहाय्य केले.