Ahmednagar Breaking : वाढती गुन्हेगारी पाहता गुन्हेगारांवर खाकीचा वचक राहिलाय की नाही? असा प्रश्न पडतो. आता कारवाईसाठी आलेल्या पोलिसावरच जुगारींनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. तब्बल दहा लोकांनी खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसाची सुटका केल्याने तो बचावला. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे शनिवारी रात्री घडली. हवालदार रवींद्र खळेकर असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून ते तालुका पोलिस ठाणे अंतर्गत पढेगावचे अंमलदार म्हणून कार्यरत आहेत.
अधिक महती अशी : शनिवारी आठवडे बाजार असल्याने येथे गस्त घालण्यासाठी खळेकर हे होमगार्ड सुनील देवकर व किशोर खरात यांना सोबत घेऊन गेले. दरम्यान बाजारात गस्त घालताना शाळेच्या भिंतीलगत काहीजण सोरट खेळताना त्यांना आढळून आले.
पोलिसांना पाहून त्यांनी धूम ठोकली. यात किशोर रंगनाथ मांजरे व दीपक सांवत बर्डे या दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांनी या पोलिस व होमगार्ड यांच्याशी हुज्जत घालायला सुरवात केली. हे पाहून नऊ ते दहा लोक तेथे आले त्यांनी या दोघांची खळेकर यांच्या
ताब्यातून सुटका करत पथकाला धक्काबुक्की करत खळेकर यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. खळेकर हे जखमी झाल्याने स्वतःला वाचवण्यासाठी पळाले. गावातील काही लोक त्यांच्या मदतीला धावले व हल्ल्यातून सुटका केली.
दरम्यान हवालदार खळेकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाबासाहेब रंगनाथ मांजरे, सौरभ अण्णासाहेब गायकवाड, सौरभ गायकवाड, अरुण पोपट खैरनार, सुनील बाजीराव तोरणे, भाऊसाहेब बारकू गायकवाड, सुभान बाबामिया शेख,
पिंट्या खैरनार, महेश बाबासाहेब मांजरे आदींसह चार अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना घडल्यानंतर तालुक्यात विविध प्रकारच्या चर्चा सुरु होत्या.