अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात वाळू तस्करणाची मुजोरी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यांना कायदयाचे धाक उरलेले नाही असेच चित्र सध्या या प्रकरणामुळे दिसून येत आहे, हे स्पष्ट झाले आहे.
नुकतेच श्रीगोंदा शहरात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी आपल्या पथकासह पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात लावला.
मात्र, अवघ्या एका तासात वाळूने भरलेला हा ट्रक गायब झाल्याने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. तालुक्यात घोड, भीमा नदीपात्रांतील कुठलाही लिलाव झाला नसताना मोठय़ा प्रमाणात वाळूतस्करी केली जाते.
यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून वाळूचोरी, वाहतूक करणाऱया गाडीचालक-मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणाबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून सध्या संयुक्त कारवाई सुरू आहे. तहसीलदार प्रदीप पवार यांनी मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास मांडवगण रस्त्यावर एक वाळूचा भरलेला ट्रक पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावला.
परंतु, हा ट्रक अवघ्या एकच तासात तहसील कार्यालयाच्या आवारातून ट्रक गायब झाला. याबाबतची सखोल चौकशी करून सदर गाडीचालक व मालकावर कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.