Ahmadnagar Breaking : गोमांस तस्करी प्रवरा परिसरात थांबण्याचं नांव घेत नाही. शुक्रवारी पुन्हा आरटीओ विभागाच्या तपासणीत सुमारे १२ नवजात वासर असलेला टेम्पो पकडला आहे. एकूण ३ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
यामध्ये एका आरोपीस अटक केली असली, तरी गोमांस तस्करीच्या उगमस्थानाच्या मुळावर घाव घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असिफ रफिक शेख (रा. ममदापूर), असे अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. कोल्हार येथे श्रीरामपूर आरटीओ विभागाचे पथक वाहनांची तपासणी करीत होते.
कागदपत्रांची तपासणी करतांना टेम्पोचा नंबर व चेसी नंबर वेगवेगळा असल्याचे यावेळी समोर आले. यावेळी त्यांना सुमारे १२ नवजात वासरं घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर संशय बळावला.
वाहन चालक संधी साधत टेम्पो सोडून पळून गेला. त्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले. आरटीओ विभागाने टेम्पोसह वासरं ताब्यात घेऊन कोल्हार पोलीस क्षेत्रात आणले. सदर सर्व वासर संगमनेर येथील जीवदया गोशाळेत पाठविले आहे.
कोल्हार परिसरात ही सलग चौथी कारवाई असून आता लोणी पोलिसांनी गोधन वाचविण्यासाठी गोमांस तस्करी करणाऱ्या ठिकाणी मुळावरच घाव घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते व काही सजक हिंदू नागरिकांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला होता. परिवहन विभागाचे असिस्टंट इन्स्पेक्टर मयूर मोकळ, गणेश गांगुर्डे, रोशन चपलवा आदींनी ही कारवाई केली. पुढील तपास लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस फौजदार बाबासाहेब लबडे करीत आहेत.
दरम्यान, ज्या टेम्पो मधून ही वासरं कत्तलीसाठी घेऊन जात होती. त्यामध्ये शस्त्र सापडली आहेत. वासरांचा हंबरण्याचा आवाज येऊ नये म्हणून त्यांच्या तोंडास पट्टी बांधलेली आढळली. सदर वाहनही (एमच १७- २४१२) अनधिकृत असल्याचे आरटीओ अधिकारी यांनी सांगितले आहे.
दिड महिने पालनपोषण करून वासरं गोशाळेत द्या!
वासर कत्तलखान्यात पाठविण्याआधी गोपालकांनी सदर वासरांचे किमान दीड महिने पालनपोषण करावे आणि नंतर ते संगमनेर येथील गोशाळेत द्यावे. आपण गोमातेला देव मानतो मात्र, त्याच कत्तलीसाठी देत असेल तर तुम्ही मोठे पाप करीत आहात.
चालू महिन्यात उत्तर नगर जिल्ह्यात १०० पेक्षा जास्त गोमतेचे प्राण वाचविले आहेत. सर्व गोपालकांनी आपल्या दैवताचा आदर करून त्यास गोशाळेत द्यावे. – डॉ. आबासाहेब नाईकवाडे, प्राणी कल्याण अधिकारी, मुंबई
कोल्हार येथे वाहन तपासणी करीत असताना एका टेम्पोचा नंबर व चेसी नंबर जुळत नसल्याने तपासणी केली असता सदर टेम्पोत नवजात वासरं आढळली आहेत. मोटार वाहन कायद्या अंतर्गत त्यांना ३० हजरांचा दंड करण्यात आला आहे.
सदर वाहन व वासरं लोणी पोलिसांच्या स्वाधीन केली आहेत. – गणेश राठोड, वाहतुक उपनिरिक्षक आरटीओ विभाग, श्रीरामपूर