अहमदनगर लाईव्ह 24 टीम /पारनेर : तालुक्यातील भाळवणी येथील डोंगरवाडी परिसरात विनायक देवराम गवळी यांच्या घराची मागील भिंत फोडून चोरट्यांनीसात तोळे दागिने व रोख रक्कम लांबवली.
गवळी हे कुटुंबीयांसमवेत घराच्या बंदिस्त पडवीत झोपले होते. त्यांची पुणे येथील बहीण व भाची सुटी असल्याने आईला भेटण्यासाठी आल्या होत्या. सर्व मंडळी रात्री एकपर्यंत गप्पा मारत बसले होते.
पहाटे पाच वाजता शेजारी संपत रोहोकले यांनी गवळी यांना फोन करून मागील भिंत फुटल्याचे सांगितले. चोरांनी सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने व ऐंशी हजारांची रोकड लंपास केली.
चोरट्यांनी घरात उचकापाचक करून कपडे अस्ताव्यस्त टाकले होते. एक पेटी चोरट्यांनी घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर कांद्याच्या शेतामध्ये नेऊन कटावणीने कुलूप तोडले.
त्यातील दागिने घेत कपडे व पेटी शेतात टाकून चोर पसार झाले. चोरीच्या तपासासाठी नगर येथून श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.
चोराचा माग घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत दैठणे रोडपर्यंत निघाला. तेथून पुढे चोर वाहनाने पसार झाले असावेत.