अहमदनगर लाईव्ह 24 टीम / वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक भेट ही राष्ट्रीय सुरक्षा आणि वैश्विक अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाची आहे, असा सूर अमेरिकेच्या खासदारांनी मंगळवारी काढला आहे. भारत चांगला मित्र, सहकारी आणि पृथ्वीतलावरील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे, असेही या खासदारांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची जगभरात जोरदार चर्चा होत असतानाच तमाम अमेरिकन खासदारांनासुद्धा याबद्दल अभिमान वाटू लागला आहे. अमेरिकन संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटमधील खासदार टेड क्रूज यांनी ट्विटरवरून म्हटले की, गेल्या वर्षी टेक्सासमध्ये नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्याची संधी प्राप्त झाली होती. तेव्हा प्रचंड अभिमान वाटला. भारत-अमेरिका मैत्रीविषयी तेव्हा मी दृढ संकल्प व्यक्त केला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली.
भारत दौऱ्यावेळी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले आहे. हे पाहून आम्हा सर्वांना प्रचंड आनंद झाला आहे, अशी स्वयंस्फूर्त प्रतिक्रिया पीट ओल्सन यांनी दिली. भारत हा व्यापारिक आणि कूटनीतिक दोन्ही बाबतीत अमेरिकेचा महत्त्वपूर्ण भागीदार देश असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली आहे.
रिपब्लिकन नेते केविन मॅककर्थी यांनी ‘फॉक्स न्यूज’शी बोलताना म्हटले की, भारतात ट्रम्प यांचे धडाकेबाज स्वागत झाले आहे. यातून उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांची नाळ घट्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारत-अमेरिकेमुळेच जग सुरक्षित असल्याचे प्रतिबिंब ट्रम्प यांच्या दौऱ्यातून उमटल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, अमेरिका-भारत स्वत:च्या द्विपक्षीय संबंधांचा विस्तार करीत आहेत. विशेषत: व्यापारिक संबंधाला बळकटी दिली जात आहे. आता पुढील टप्प्यात मानवाधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्याविषयी दोन्ही देशांनी चर्चा करावी, असे मत खा. जेम्स लँकफोर्ड यांनी व्यक्त केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com