शिर्डी : महाराष्ट्रात लवकरच बळीराजा व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सरकार येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी व्यक्त केली. पार्थ पवार यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, उपतालुकाध्यक्ष सुधाकर शिंदे, शिर्डी शहराध्यक्ष महेंद्र शेळके, माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस निलेश कोते, गौतमचे चेअरमन बाबासाहेब कोते,
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सत्कार केला.
यावेळी पार्थ पवार यांनी महाराष्ट्रात लवकरच बळीराजा व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत यासाठी आपण साईबाबांकडे प्रार्थना केली आहे. भाजप सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे.
राज्यात शेतकरी वर्गास कर्जमाफीबाबत दिलासा देण्याऐवजी नियमांच्या जाचक अटी लादून त्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहण्याचे काम केले. युवकांना काम नसल्याने बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक कंपन्या बंद पडल्याने नोकरवर्गावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
राज्यात आर्थिक मंदी आली आहे. बेरोजगारांना नोकरी व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास भाजप सरकार सपशेल अपयशी ठरले. राज्यात लवकरच बळीराजा व सर्वसामान्य जनतेचे सरकार येणार आहे.
राज्यातील बेरोजगारी कमी व्हावी, बंद पडलेल्या छोट्या मोठ्या कंपन्या पूर्ववत सुरू व्हाव्या, शेतकरी वर्गास कर्जमाफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस विशेष प्राधान्य देणार असून यासाठी विशेष पाठपुरावा करून जनतेला आधार देण्याचे काम करणार आहे. लवकरच बेरोजगार तरुणांसाठी भव्य असा मेळावा घेऊन प्रशिक्षण देणार असल्याचे प्रार्थ पवार यांनी सांगितले.