अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असताना दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. नुकतेच शहरात एक चोरीची घटना घडली आहे.
घर बंद करून फिरायला गेलेल्या एका व्यवसायिकाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारून रोख रक्कम, सोन्या- चांदीचे दागिणे असा 3 लाख 5 हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री उशिरा घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा प्रकार तारकपूर येथील सिंधी कॉलनीमध्ये घडला आहे.
याबाबत फिर्यादी अशोक नंदलाला सुहेदा यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अशोक सुहेदा सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांचे घर बंद करून कुटुंबासह निंबोडी (ता. नगर) येथे नातेवाईकांच्या आनंदवन ऍडव्हेंचर पार्क येथे फिरण्यासाठी गेले होते. यानंतर चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
व घरातील 3 लाख 5 हजारांचा ऐवज लंपास केला. सुहेदा कुटुंब साडेसहाच्या सुमारास घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुभेदा यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहे.