अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- दि. ३० रोजी डॉक्टरांची अपॉईंटमेट मिळाल्याने सकाळी सिंधूबाई, रेखा जरे, त्यांचा मुलगा कुणाल तसेच विजयमाला रमेश माने हे रेखा जरे यांची सॅन्ट्रो कंपनीची गाडी (क्र. एम एच १२ ई जी ९१४६) ने सकाळी सव्वासात वाजता पुण्याला जाण्यासाठी नगर येथून निघाले.
पुण्यात पोहचल्यानंतर विजयमाला माने यांना येरवडा परिसरात सकाळी साडेदहा वाजता सोडून सिंंधूबाई, रेखा जरे व कुणाल हे डॉ. सचिन तपस्वी यांच्या रूबी हॉलजवळील हॉस्पिटलला सकाळी ११. ४५ च्या दरम्यान पोहचले. दुपारी ३.४५ वाजता तेथील उपचार संपल्याने तेथून त्या बाहेर आल्या. त्यावेळी तेथे रूणाल जरे, आकांक्षा जरे, रूणालचा मित्र पुष्कर, विजयमाला माने हे हजर होते. तेथून रूणालच्या अॅव्हीएटर दुचाकीवर रूणाल व त्याचा मित्र बसला.
तर सॅन्ट्रोमध्ये इतर सदस्य बसले. पुणे स्टेशन येथे आल्यानंतर नियोजन बदलले. तेथून अॅव्हीएटर गाडीवर रेखा जरे व त्यांची सुन आकांक्षा या रविवार पेठ येथे खरेदीसाठी गेल्या. तर सिंधूबाई, रूणाल, कुणाल, पुष्कर व विजयमाला माने हे सॅन्ट्रो गाडीतून खराडी बायपास येथील तुलसी हॉटेल येथे जेवणासाठी पोहचले. तेथे रेखा जरे व त्यांची सुन आकांक्षा आल्यानंतर त्यांचेही जेवण झाले.
तेथून ४ वाजून ४५ मिनिटांनी रेखा जरे, सिंधूबाई, विजयमाला माने, कुणाल हे नगरकडे सॅन्ट्रोमधून निघाले. परतीच्या प्रवासातही रेखा जरे याच गाडी चालवित होत्या. त्यांच्या शेजारच्या सिटवर विजयमाला माने, रेखा जरे यांच्या पाठीमागे सिंधूबाई तर माने यांच्या पाठीमागे कुणाल जरे बसलेला होता. त्यांची गाडी जातेगाव घाट येथे आली असता पाठीमागून काळया रंगाची मोटारसायकल (क्र. एम एच १७ – २३८०) ही आली. मोटारसायकलस्वाराने कट मारून सॅन्ट्रोसमोर मोटारसायकल थांबवत हाताने गाडी थांबविण्याचा इशारा केला.
रेखा जरे यांनी गाडी थांबविली. मोटारसायकल चालविणाऱ्याने डार्क ब्राउन रंगाचे लेदर जॅकेट घातलेले होते तर पाठीमागे बसलेल्याने ब्लॅक शर्ट, जिन्स, डोक्याला काळया रंगाचा गॉगल लावलेला होता. मोटारसायकल चालविणाऱ्याने गाडीजवळ येउन रेखा जरे यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. तुम्हाला गाडी चालविता येत नाही तर चालविता कशाला ? त्यावर तु गाडी निट चालव असे रेखा जरे म्हणाल्या. त्यावर त्या तरूणाने नाव विचारल्यावर मी रेखा भाउसाहेब जरे, यशस्वीनी महिला ब्रिगेडची अध्यक्ष आहे. त्याचे नाव विचारल्यावर त्याने नाव सांगितले नाही.
ब्राउन जॅकेटवाला वाद घालीत असताना काळा शर्ट घातलेल्या तरूणाने कोणाला तरी फोन लावला व म्हणाला की इनका क्या करना है ? थोडया वेळाने फोन ठेवल्यावर त्याने समोर येउन जरे यांच्या गाडीचा फोटो काढला. त्याच वेळी कुणाल याने काळा शर्ट परिधान केलेल्या तरूणाचा फोटा त्याच्या मोबाईलमध्ये काढला. फोटो काढून तो पुन्हा मोटारसायकलजवळ जाउन उभा राहिला. त्यानंतर ब्राउन जॅकेटवाल्या तरूणाने पुन्हा वाद घालण्यास सुरूवात करीत रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला.
त्यानंतर तो मोटारसायकलकडे धावला. काळया रंगाचा शर्ट घातलेल्या तरूणाने मोटारसायकल सुरू केली व ते नगरच्या दिशेने पळून गेले. गळयाला शस्त्र लागल्याने रेखा जरे ओरडत होत्या. त्या जखमी अवस्थेत असताना रस्त्यावरून जाणारे कोणीही मदतीसाठी थांबले नाही. विजयमाला व कुणाल यांनी जरे यांना ड्रायव्हिंग सिटवरून काढून दुसऱ्या सिटवर बसविले. तेथून विजयमाला यांनी गाडी चालवून सुपा टोलनाका इथपर्यंत ते आले. तेथून अॅब्युलन्सच्या मदतीने जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे रेखा जरे यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले.