अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- ज्या नेवाशात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण नगर जिल्हा लाॅकडाऊन करावा लागला होता, त्या तालुक्याला कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातून वंचित ठेवण्यात आले आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यात नगर येथील डाॅक्टरला कोरोना झाल्यानंतर प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली. १८ मार्चला नेवासे शहरातील व्यावसायिक पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जिल्हा खडबडून जागा झाला.
देशभरात २१ मार्चपासून लॉकडाऊन होणार होते, पण जिल्ह्यात १९ मार्चपासूनच लॉकडाऊन लागू झाला. दहा महिन्यांनंतर लस जिल्ह्यात दाखल झाली, परंतु पहिल्या टप्प्यातील लसीकरणात नेवासे वगळल्याने अन्याय झाला आहे.
तालुक्यात आतापर्यंत २९४२ कोरोना रुग्ण आढळून आले. तालुक्यातील प्रत्येक गावात रुग्ण आढळले. त्यातील ५४ रुग्ण दगावले. २८ मृत व्यक्ती नेवासे शहरातील व्यापारी कुटुंबांतील आहेत.
त्यामुळे शहरात अजूनही मोठी दहशत आहे. तहसीलदार रुपेश सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी व आरोग्य यंत्रणेबरोबरच आशासेविकांनी मोठ्या हिमतीने काम केले.
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना लस देण्यात येणार आहे. त्यांची संख्या सुमारे १३५० आहे.
त्यानंतर ६५३ खासगी वैद्यकीय व्यावसायिक, कर्मचारी अशी दोन हजार व्यक्तींची यादी तयार आहे, पण पहिल्या टप्प्यात नेवासे तालुक्याला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
निष्क्रिय राजकीय नेतृत्वामुळे नेवासे तालुक्याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. आता लस वाटपातदेखील अन्याय झाला आहे, असे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सांगितले.