अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल उच्चांकी भावात विकला जावा, यासाठी आडतदाराने अनोखी शक्कल लढविली आणि लिलाव पद्धतीने उच्चांकी भावात गवार विकली गेली.
परिणामी सरासरी ८० रुपये किलो भाव निघणाऱ्या गवार शेंगभाजीला चक्क शंभर रुपयांचा दाम मिळाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकरी पुरता वैतागून गेल्याची परिस्थिती आहे.
तरीही नेप्ती उपबाजार समितीमध्ये शेतमालाची आवक नेहमीप्रमाणे सुरूच आहे. काल सोमवारी भाजीपाला मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे ग्राहकांची रेलचेल सुरू होती. दुपारच्या सुमारास एका आडतदाराकडे बाजारात शेतकऱ्याची गवार शेंगभाजी विक्रीला आली होती. गवार शेंगभाजी पाहता ग्राहकांची एकच झुंबड उडाली.
शेटजी गवार मलाच द्या, असाच कल्लोळ सुरु झाला. त्यावर आडतदाराने शेतकऱ्याचा शेतमाल उच्चांकी भावात विकावा, यासाठी लिलाव पद्धत सुरू केली. पाहता-पाहता ८० रुपये किलो विकली जाणारी गवार चक्क शंभर रुपयांपर्यंत विकली गेली.
लिलाव पद्धतीमुळे भाजीपाला विक्रीत कमालीची भाववाढ पाहून परिसरातल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कांदा या पिकाप्रमाणेच प्रत्येक भाजीपाल्याची विक्रीही लिलाव पद्धतीने व्हावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात आली.