नमस्कार मित्रांनो,
अहमदनगर जिल्ह्यातील वाढत असलेल्या कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन ,आरोग्य विभाग विविध उपाययोजना करतच आहेत. कोणत्याही नागरिकाला विनाकारण कोरोनाची लागण होउ नये म्हणुन प्रशासन अतिशय चांगले काम करत आहे. तसेच जनतेला उपासमारीच्या संकटांना सामोरे जावे लागु नये म्हणून सरकार आणि जिल्हा प्रशासन यांनी काही अटी शर्तीवर अहमदनगर मधील उद्योग व्यवसाय आणि छोटे छोटे दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सध्या अहमदनगर शहरांतील मध्यभागी कोरोनाचा प्रसार झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने काही भाग कंटेनमेंट झोन तर काही भाग बफर झोन म्हणून जाहीर केला आहे.
प्रशासनाने इतकी लोकांची काळजी घेऊनही लोकं अजिबात नियम पाळत नाहीत. आणि त्याचाच परिणाम म्हणुन अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांसाठी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अहमदनगर शहरात सुद्धा दररोज कोरोना बाधीत रूग्ण सापडतातच. त्याचे कारण सुद्धा जनताच आहे हे मात्र निश्चितच आहे. आता शासनाने 31 जुलै 2020 पर्यंत लाॅकडाऊन वाढवला आहे. कोरोनाचाप्रसार होऊ नये म्हणून खरं तर जनतेने सहकार्य करणे आवश्यक आहे. परंतु उद्योग व्यवसाय आणि जास्त पैसे कमावण्याच्या नादात शासकीय आदेश धाब्यावर बसवले आहेत. काही दिवसांनी अहमदनगर ची परिस्थिती सुद्धा मुबंई पुण्या सारखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तर शहराची परिस्थिती फारच बिकट झाली आहे.
शहरातील मध्यभाग आणि काही उपनगरात सुद्धा कोरोनाचा व्हायरस थैमान घलायला लागला आहे. शहरातील तोफखाना, नालेगाव, दिल्ली गेट भागातील काही भाग हाॅटस्पाॅट म्हणून जाहीर केला आणि सिलबंद केला आहे. इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली असताना सुद्धा नागरिक स्वतः ची आणि आपल्या परिवाराची काळजी का घेत नाहीत हेच समजत नाही. काल परवा पोलिस प्रशासन यांनी दुचाकी वाहनांना व चारचाकी वाहने यांना चांगलेच फैलावर घेतलं आणि काही प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले. खरंच पोलिस प्रशासन यांचे आभार मानले पाहिजेत. परंतु सर्व जबाबदारी फक्त प्रशासनाचीच आहे की काय असे क्षणभर वाटते. आम्ही प्रत्येक वेळी प्रशासनालाच जबाबदार धरतो, पण लोकांचीही काही जबाबदारी आहे हे का विसरतो हेच समजत नाही.
एक मात्र नक्की की आम्ही फक्त प्रशासनाची बाजूच मांडली नाही तर नागरिकांचे वेगवेगळे प्रश्न सुध्दा लेखाचे माध्यमातून मांडले आहेत. त्यावेळी प्रशासनाला सुद्धा जाब विचारला आहे. पण आता काही बेजबाबदार लोकांच्या वागणूकी मुळे जबाबदार नागरिक अडचणीत सापडत असतो हे सत्य आहे. आता लाॅकडाऊन व संचारबंदी शिथील झाली आहे, म्हणून नियमाचे उल्लंघन केले तर आपले कोणीच काही करू शकत नाही ह्या आडमुठेपणामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो हे का समजत नाही. प्रत्येक वेळी पोलिस व महापालिका प्रशासनाने केसेसच केल्या पाहिजेत का ?
आपण सुध्दा माणसंच आहोत ना, मग माणसाने माणसांसारखं वागले तर बिघडलं कुठं. तुम्ही खुशाल तुमचे उद्योग व्यवसाय, नोकरी, धंदा करा ना, पण आपल्या मुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे वाटते आहे. लाॅकडाऊन च्या काळात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत हे पण सत्य आहे. अनेकदा गोरगरीब लोकांची उपासमार पण झाली. तरीही प्रशासनाने राशनकार्ड नसताना सुद्धा सर्व लोकांना राशन देण्याचे आदेश राशन दुकानदारानां दिले आहेत.
तसेच अहमदनगर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था, लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन यांनी गरजू लोकांना जेवण सुद्धा पुरविले आहे. शहरातील सर्व अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. मग नेहमीच लोक नियमाचे उल्लंघन करण्यात धन्यता का मानतात. अर्थात ज्यांचे हात हे फार वरपर्यंत पोहचले आहेत हेच लोकं असे बेजबाबदार वागताता हे जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन, महापालिका प्रशासन यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
गोरगरीब जनता तर फक्त रोजगार मिळेल याच हेतुने घराबाहेर पडतात. भाजीपाला बाजार व आठवडे बाजार भरवण्याची परवानगी नसताना सुद्धा बाजार भरलाच जातो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज मार्केट यार्ड मध्ये सुद्धा भाजीपाला बाजार सकाळी सकाळी भरवला होता. अर्थात शेतकरी वर्गाला नुकसान होऊ नये म्हणून कदाचित शासनाचे परवानगी घेऊन तो बाजार भरवला असेल. परंतु आडते बाजार, दाळमंडई या भागात काही दुकानदारांनी नियम पाळले पाहिजेत.
त्या भागातील सर्व व्यवहार सुरू आहेत त्यामुळे गर्दी होत आहे. आता तर या भागात सुद्धा कोरोना बाधीत सापडले आहेत. एक गोष्ट मात्र निश्चितच आहे की, जास्त प्रमाणात वाहने रस्त्यावर आणण्याची परवानगी लोकांना दिली आहे त्याचाच हा दुष्परिणाम पहायला मिळत आहे. जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी कितीही काळजी घेतली तरी आता शासकीय आदेश धाब्यावर बसवायचेच असे जनतेनीच ठरवलेले दिसतंय.
शासनाने अजुन किती जनजागृती करावी, किती लोकांवर केसेस दाखल कराव्यात आणि किती दुकान बंद करावीत हे न उलगडलेले कोडे आहे. नागरिक हो अजुन ही इथले भय संपले नाही याची जाणीव ठेवावी अशी अपेक्षा आहे. दररोज तुम्हाला उपदेशाचे ढोस पाजणे हे जरी बरोबर नसले तरी काही बेजबाबदार लोकांच्या वागणूकी मुळे गोरगरीब लोकांची अडचण होऊ नये हाच आमचा प्रमुख उद्देश आहे. दवाखान्यात जायची सुद्धा काही गोरगरीब कुटुंबाची ऐपत नाही.
कसेतरी कामधंदा करून आपल्या कुटुंबियांना सांभाळणारे अनेक गोरगरीब लोक अहमदनगर जिल्ह्यात आहेत. लाॅकडाऊन च्या काळातच अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील घडले आहेत. तसेच काही व्यवसायिक लोकांनी लाॅकडाऊन शिथिल केल्याचा गैरफायदा पण घेतला आहे. बेकायदेशीर दारू, गुटखा, मावा, गो मांस आणि सुगंधी तंबाखू अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय करणारे लोकांवर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हेदाखल करण्यात आले आहेत.
परंतु त्यांना लगेच जामीन मंजूर करण्यात आल्यामुळे कायद्याचा धाक राहीला नाही. जिल्हा प्रशासनाने नेमकी कोणती भूमिका घेतली तरच अहमदनगरचे बेजबाबदार लोकांना आळा बसेल हाच एकमेव प्रश्न निर्माण झाला आहे. आता अशा बेजबाबदार लोकांना वठणीवर आणायचे असेल तर त्यांचे व्यवसायच लाॅकडाऊन संपेपर्यंत सिलबंद करणे आणि जास्तीत जास्त दंड आकारला पाहिजे असे वाटते. नागरिक हो खरंच आता परिस्थिती हाताबाहेर गेली तर आपले फार मोठे नुकसान होईल याची जाणीव असू द्या.
संपूर्ण शहरात जर कोरोना पसरला तर मेलेले माणंस उचलायला सुद्धा माणूस सापडणार नाही याची जाणीव असू द्या. मा. जिल्हाधिकारी साहेब, पोलिस अधीक्षक साहेब आणि महापालिका आयुक्त साहेब आपण खरोखरच शहरातील समाजसेवक, संस्था, लोकप्रतिनिधी, डाॅक्टर, पत्रकार मंडळी आणि सर्व कोरोना योद्धे यांचे मदतीने अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी खुप चांगले काम केले आहे आणि करत आहेत. पण साहेब तुम्ही काहीही करा, कितीही नियम कडक करा किंवा कितीही केसेस दाखल करा,पण आता शहरातील काही बेजबाबदार लोकांनीच नियमाचे उल्लंघन करायचे ठरवले आहे असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.
गोरगरीब जनतेला एकच विनंती आहे की, कृपया कोरोना सदृस्य काही लक्षणे दिसू लागली की त्वरित डाॅक्टरनां दाखवा आणि तपासणी करून घेतली पाहिजे. तसेच आपल्या परिसरात नवीन संशयास्पद कोणी व्यक्ती आढल्यास प्रशासनाचे निदर्शनास आणून दिले पाहिजे असे वाटते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आपल्या सोबत आहे. त्यामुळे घाबरून जाता कामा नये. कोणत्याही प्रकारची अडचण आली तर प्रशासन किंवा आपले लोकप्रतिनिधी यांना कळविण्यात यावे. आपण आपली व परिवाराची काळजी घ्यावी हि विनंती. घरीच रहा सुरक्षित रहा. धन्यवाद
ॲड शिवाजी अण्णा कराळे
सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर
99 22 645 545