विखेंच्या पोस्टरबाजीमुळे थोरातांची झाली कोंडी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- एकीकडे थोरात- विखे वर्चस्वाच्या वादाचे परिणाम जिल्हा बँक निवडणुकीत दिसत असताना, गावगल्लीतही कोंडीचे राजकारण सुरू आहे.

संगमनेर विधानसभा मतदार संघातील जोर्वे हे शिर्डी मतदार संघात गेल्यापासून महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची कोंडी झाली आहे. आपले पारंपारिक विरोधक असलेल्या विखेंनी जोर्वेत विकास कामांचा धडाका सुरु ठेवल्याने सातत्याने विखेंचे जोर्वेत येणे-जाणे सुरुच असते.

नुकत्याच जोर्वेत झालेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी विखे पाटील जोर्वेत आले होते. त्यांच्या स्वागतासाठी सुमारे ३० फ्लेक्स बोर्ड लागले गेले. १३ फेब्रुवारी रोजी थोरातांच्या उपस्थितीत जोर्वेत कबड्डी स्पर्धेंचा समारोप होणार आहे.

मात्र थोरातांचे फ्लेक्स लावण्यास विखेंच्या कार्यकर्त्यांनी गावात जागाच शिल्लक ठेवली नसल्याने फ्लेक्स युद्धात विखेंकडून थोरातांची कोंडी करण्यात आली आहे. या फ्लेक्स युद्धाची जोरदार चर्चा होत आहे. शिर्डी मतदारसंघात विकासाची प्रक्रीया निरंतर सुरू आहे. आता पर्यंत जोर्वे गावातच १६ कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लावली आहेत.

विकास कामांना निधी कमी पडणार नाही. असा शब्द विखेंनी दिला आहे. दरम्यान आता १३ फेब्रुवारी रोजी होणार्‍या कबड्डी स्पर्धेच्या समारोपात ना. थोरात हे आपल्याच जोर्वेतील विखे समर्थकांचा कसा समाचार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन दिग्गजांच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली पोस्टरबाजी ना. थोरात यांचा वाढदिवस शुभेच्छा फ्लेक्स हा जोर्वेतील मुख्य चौकात त्यांच्या कार्यकर्त्यांनी १ फेब्रुवारी रोजी लावला. ज्या ठिकाणी नेहमी आ. विखे यांचा फ्लेक्स लागत असे तेथे तो लागला. दि. ५ फेब्रुवारी रोजी विखे यांच्या उपस्थितीत जोर्वेत विविध विकास कामांचे उद्घाटन होते.

मात्र त्यापूर्वीच थोरातांच्या कार्यकर्त्यांनी त्याच नियोजित फ्लेक्सच्या जागी थोरातांचा फ्लेक्स लावला. याला प्रत्युत्तर म्हणून विखेंच्या कार्यकर्त्यांनी गावात ३० फ्लेक्स लावून थोरातांच्या कार्यकर्त्यांना जोरदार उत्तर दिले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24