बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या १६ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्यानंतर त्यांनी गुरुवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
त्यानंतर आगामी ५ डिसेंबर रोजी राज्यात १५ जागांसाठी होऊ घातलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत यापैकी १३ जणांना भाजपने उमेदवारी देऊ केली आहे.
या पोटनिवडणुकीत सर्वाधिक जागांवर विजय मिळवीत राज्यातील सरकारला पूर्ण बहुमत मिळवून देण्याचा भाजपचा मुख्य हेतू आहे.
कर्नाटकच्या राजकारणाला नाट्यमय वळण देणाऱ्या घटनाक्रमात १६ अपात्र आमदारांनी अखेर भाजपमध्ये जाणे पसंत केले आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूतील भाजप मुख्यालयात त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सचिव पी. मुरलीधर राव उपस्थित होते. १६ पैकी १३ जणांना विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने तिकिट दिले आहे.
या निवडणुकीत नशीब आजमावणारे उमेदवार हे भविष्यातील आमदार आणि मंत्री आहेत, असे सांगत मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.
विशेष बाब अशी की, काँग्रेस-जेडीएसच्या १७ आमदारांना अपात्र ठरविण्याचा विधानसभा सभापती आर. रमेश कुमार यांचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला आहे.
याबरोबरच येत्या ५ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत नशीब आजमाविण्याचा त्यांचा मार्ग न्यायालयाने मोकळा केला आहे. सभापतींच्या आदेशातील वरील आमदारांना १५ व्या विधानसभेच्या कार्यकाळापर्यंत अयोग्य घोषित करण्याचा भाग मात्र खंडपीठाने रद्द केला आहे.