श्रीरामपूर :- अंगणात खेळणाऱ्या मुलांच्या वादातून शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी दाखल झालेल्या तक्रारीवरून मंगळवारी सायंकाळी हुसेननगर भागात झालेल्या गोळीबारात तिघे जखमी झाले. गोळीबार केल्यानंतर पळताना रस्त्यावर पडल्याने जखमी झालेल्या दोन आरोपींना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
मंगळवारी दुपारी घरासमोर मुलांचा गोंगाट सुरू असल्याने रिजवाना फरीद शेख यांनी त्यांना खडसावले. या कारणातून शेजारी शेजारी राहणाऱ्या रिजवाना शेख व मेहरूनिसा शेख यांच्या कुटुंबात वाद झाले. हा वाद शहर पोलिस ठाण्यात पोहोचला.
दोन्ही कुटुंबीयांच्या वतीने परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. समज देण्यासाठी पोलिसांनी बुधवारी दोन्ही कुटुंबांना पाचारण केले. पोलिसांची चर्चा झाल्यानंतर ते घरी आले. दरम्यान, मेहरूनिसाने औरंगाबाद येथील नातेवाईक सय्यद मुजीब व शेख रफद यांना बोलावून घेतले.
ते आल्यानंतर सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास या दोन्ही कुटुंबांत पुन्हा वाद झाला. सय्यद मुजीब व शेख रफद यांनी गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात शरीफ, जमील व फरीद हे तिघे जखमी झाले. जमीलच्या छातीला, तर फरीदच्या हाताला गोळी चाटून गेली.
गोळीबारानंतर दोघेही पळून जाताना ते खाली पडल्याने नागरिकांनी त्यांना पकडून चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमींना साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींवरही तेथेच उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. शेख रफद शेख रशीद (२६, औरंगाबाद), सय्यद मुजीब सय्यद मैनोद्दीन (३२, अन्सार कॉलनी, पढेगाव, ता. औरंगाबाद) अशी आरोपींची, तर शरीफ रशीद शेख, जमील रशीद शेख, फरीद रशीद शेख (हुसेननगर, श्रीरामपूर) अशी जखमींची नावे आहेत.