कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी दिले ‘हे’ निर्देश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी कृतिशील वागण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर, अनावश्यक रित्या घराबाहेर न पडणे आणि आजाराची लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची तपासणी करुन घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर ‘चेस दी वायरस’ अशा पद्धतीने आता आरोग्य यंत्रणा काम करणार आहे. ज्याठिकाणी बाधित व्यक्तींची संख्या जास्त आहे, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात तपासणी करुन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करुन कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

ज्यांना लक्षणे नाहीत, अशा कोरोना बाधित रुग्णांनी  जिल्हा रुग्णालयात येण्याएवजी त्यांच्या जवळच्या तालुकास्तरीय किंवा महानगरपालिका क्षेत्रातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी आज येथील जिल्हा रुग्णालयात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला तसेच आरोग्य अधिकार्‍यांशी चर्चा केली.

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव राज्यभरात सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्या तीन महिन्यात बाधितांची संख्या आटोक्यात होती. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद या शासकीय यंत्रणांसह लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था यांनीही त्याकामी महत्वाची भूमिका बजावली. मात्र, लॉकडाऊन शिथीलतेनंतर बाहेरच्या जिल्ह्यातून येणार्‍या नागरिकांचा ओघ वाढला आणि त्यातून संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे. हे रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने जलद गतीने बाधितांच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासणी करण्यासाठी अॅंटीजेन चाचण्या करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.

त्याचबरोबर खाजगी प्रयोगशाळांमधूनही कोरोना तपासणी करण्यात येत आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्णाचे लवकर निदान होत असून त्यांच्यावर तात्काळ उपचार करणे शक्य होत आहे. मात्र, खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून येणार्‍या परंतू लक्षणे न जाणवणार्‍या रुग्णांना अशा प्रयोगशाळा अथवा खासगी रुग्णालये जिल्हा रुग्णालयात पाठवित आहेत.

वास्तविक अशा रुग्णांसाठी आपण प्रत्येक तालुक्यात तसेच महानगरपालिका स्तरावर कोविड केअर सेंटर सुरु केली आहेत. अशा रुग्णांना त्याठिकाणी उपचारासाठी दाखल होण्याबाबत संबंधित खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांनी सांगणे आवश्यक आहे. अशा रुग्णांना तेथे अधिक उपचारांची गरज असेल तरच त्यांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर,  जिल्हा रुग्णालय किंवा खासगी कोविड हॉस्पिटल येथे पाठविणे आवश्यक असल्याचे श्री. द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. घरातील वृद्ध आणि बालके यांचा सार्वजनिक ठिकाणचा संपर्क टाळणे आवश्यक आहे. विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर येऊ नये. संसर्गाची ही साखळी तोडायची असेल तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर मास्क घालून बाहेर पडा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी  यांनी केले आहे. सर्व अधिकारी-कर्मचारी आणि या आपत्कालिन परिस्थितीत काम करणार्‍या सर्व यंत्रणांनी स्वताच्याही आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्लाही श्री. द्विवेदी यांनी दिला.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24