अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. बिबट्याच्या हल्यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
तर काहींना बिबट्याने गंभीर जखमी केले आहे. बिबट्या आपल्या पोटच्या गोळ्याची शिकार करणार असल्याचे लक्षात येताच मातेनं प्रसंगावधान राखून सर्व ताकद एकवटून त्याच्या अंगावर जोराने खुर्ची फेकून मुलीचा जीव वाचवल्याची थरारक घटना भंडारदरा येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सौ. रंजना सुनील भांगरे ही आदिवासी महिला आपल्या घरात आपल्या दोन वर्षाच्या धनश्री मुलीला घेऊन टीव्ही पहात होती. यावेळी अचानक कुत्रे मोठ्याने भुंकू लागले.
रंजनाबाई काय झाले म्हणून दरवाजा जवळ आल्या तर बिबट्या दारात एक पाय व घरात एक पाय टाकून उभा होता. बिबट्या समोर धनश्री होती,
त्याने तिला पाहिले व जोराचा आवाज करत पुढे दुसरे पाऊल टाकताच तिने सर्व ताकद एकवटून ओरडून बिबट्याला खुर्ची अंगावर फेकत व मुलीला पोटाशी धरून वाचवा म्हणत आजूबाजूला असणार्या वस्तीच्या लोकांना बोलवले. त्यामुळे बिबट्या तेथून पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच राजूरचे वनक्षेत्रपाल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिथे पिंजरा लावून आजूबाजूच्या शेतकर्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. हा बिबट्या मादी जातीचा असून त्याला तीन बछडे असल्याचे चर्चा परिसरातील लोक करत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे.