ब्रेकिंग

Ahmednagar Accident : नाशिक-पुणे महामार्गावर ट्रक कारवर कोसळून भीषण अपघात, चौघे जागीच ठार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Accident : अहमदनगरमधून एक मोठी बातमी आली आहे. नाशिक – पुणे महामार्गावर मालवाहतूक ट्रक कारवर कोसळून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. संगमनेरच्या चंदनापुरी गावाजवळ हा अपघात घडला.

अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. अपघाताची माहिती मिळतच स्थानिकांनी याठिकाणी गर्दी केली. ही घटना काल (दि.१७ डिसेंबर) रात्री आठ वाजता घडली. पोलिसांचं ओळख पटवण्याचं काम उशिरापर्यंत सुरु होत. रात्री उशिरा मृतांची ओळख पटली असून आशा सुरेश धारणकर (वय ४२),

सुनील धारणकर (वय ६५), अभय सुरेश धारणकर (वय ४५) व ओजवी धारणकर (वय २ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. यात अस्मिता अभय मिसाळ (वय ४०) या जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातातील मृत व जखमी अकोले तालुक्यातील कुंभेफळ गावातील रहिवासी असल्याचे समजते.

अधिक माहितीनुसार, रात्री आठ वाजेला संगमनेरमधील चंदनापुरी घाटात नाशिककडे जाणाऱ्या एका ट्रक आणि कारमध्ये जोराची धडक झाली. मालवाहू ट्रक सर्व्हीस लेनवरून जाणाऱ्या कारवर पलटी झाला अशी प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान हा अपघात कोणत्या कारणास्तव किंवा कोणाच्या चुकीमुळे झाला याचा उलगडा अद्याप झाला नाही. जखमी महिलेचा जबाब नोंदवून झाल्यानंतर व फरार ट्रकचालक ताब्यात आल्यानंतर इतर गोष्टींचा उलगडा होणार आहे.

अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थ व डोळासणे महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात पाठवणे, वाहतूक सुरळीत करणे आदी कामे सुरु केली होती.

या घाटात अपघातांची मालिका ही नित्याचीच झाली असल्याने यावर काही उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Ahmednagarlive24 Office