अहिल्यानगर येथील केडगावमधील विजय मुरलीधर राऊत (वय ५२) यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरलगत धुळे-सोलापूर महामार्गावरील झाल्टा परिसरातील उभ्या ट्रकमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
बुधवारी पहाटे ५ वाजता ही घटना उघडकीस आली. ट्रकमधून दुर्गंधी आल्यामुळे स्थानिकांनी तपासणी केली असता चालकाच्या सीटमागील टुलबॉक्समध्ये राऊत यांचा मृतदेह सापडला.
मृत्यूपूर्व प्रवासाचा तपशील
विजय राऊत मागील ३० वर्षांपासून ट्रक व्यवसायात होते. ते नेहमी स्वतःच ट्रक चालवत मालाची ने-आण करत. सहा दिवसांपूर्वी राऊत मध्यप्रदेशच्या रायपूर औद्योगिक वसाहतीत माल पोहोचवण्यासाठी निघाले होते. तेथे लोखंडी सळ्या घेऊन ते रविवारी परतले. मात्र, मंगळवारी मध्यरात्री त्यांच्या संघटनेतील एका ट्रक चालकाने त्यांच्या ट्रकला झाल्टा परिसरात उभे पाहिले. त्यानंतर त्यांनी ही बाब गावाकडील संघटनेच्या सदस्यांना कळवली.
ट्रकमधून दुर्गंधीमुळे उलगडले रहस्य
संघटनेच्या सदस्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, ट्रकमधून दुर्गंधी येत असल्याचे आढळले. चालकाच्या कॅबिनमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्यांनी टुलबॉक्स उघडला. त्यामध्ये राऊत यांचा चेहऱ्यावर क्रूर वार केलेला फुगलेला मृतदेह सापडला. ही दृश्य पाहून सर्वांना मोठा धक्का बसला.
हत्या कुठे झाली?
राऊत यांची हत्या नेमकी कुठे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मारेकऱ्यांनी त्यांची हत्या दुसरीकडे करून मृतदेह टुलबॉक्समध्ये लपवून ट्रक झाल्टा परिसरात आणल्याचा संशय आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक सुनिल लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतिष वाघ, चिकलठाण्याचे उपनिरीक्षक सतिष पंडित यांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
पुढील तपास सुरू
सध्या राऊत यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन घाटी रुग्णालयात सुरू असून, मारेकऱ्यांच्या शोधासाठी तपास अधिक गतिमान करण्यात आला आहे. ही घटना केवळ अहिल्यानगर परिसरातीलच नव्हे, तर संपूर्ण भागातील नागरिकांसाठी धक्कादायक आहे. पोलिसांचा पुढील तपास त्यांच्या हत्येमागील कारण आणि मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यावर केंद्रित आहे.