अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- उसने पैसे देण्याघेण्याच्या कारणातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एकावर धारदार शस्त्राने हल्ला करीत जखमी करण्यात आले असल्याची घटना घडली आहे.
दरम्यान हा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथे घडला आहे. या मारहाणीत शापिनखान शौकत पठान रा. उपासनी गल्ली संगमनेर हा गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शापिनखान पठाण यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार आरोपी सलीम हजी,
सोनू कुरेशी, मुस्तगीम कुरेशी, सकिम कुरेशी, काशीक अशीद कुरेशी अमीर असद कुरेशी, कालेजानद कुरेशी, अब्दुल समद कुरेशी यांच्यासोबत पठाण यांची उसने पैसेसंदर्भात देवाणघेवाण होती.
ही देवाणघेवाण मिटविण्यासाठी पठाण यांना वरील आरोपींनी दिल्ली नाका येथे बोलावून घेतले. यावेळी पठाण व वरील आरोपी यांच्यात वाद होऊन बाचाबाची झाली. यावेळी आरोपींनी इतरांच्या साह्याने पठाण यांना बेदम मारहाण केली.
यावेळी काहींनी हत्याराचा वापर करीत पठाण यांना जबरी जखमी केले. त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वरील आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहे.