यॉर्क : हिंसाचाराच्या गर्तेत रुतलेल्या इराकमध्ये सरकारविरोधात जनक्षोभ उसळला आहे. इराक सरकार बरखास्त करणे, देशात आर्थिक सुधारणा घडविणे, रोजगार निर्मिती या मुद्यांवर गेल्या महिनाभरापासून देशात हिंसक निदर्शने होत आहेत. आतापर्यंत यात ३१९ जणांना प्राण गमवावा लागला आहे.
तर पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरात १५ हजार जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, हिंसाचार थांबवून इराकमध्ये तातडीने सार्वत्रिक निवडणूक घ्या, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. इराकमध्ये जोरदार निदर्शने होत असल्यामुळे सरकारने राजधानी बगदादसह अनेक शहरांमध्ये सध्या संचारबंदी लागू केली आहे.
अफवांचे पेव फुटू नये म्हणून इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे. अजूनही देशात आंदोलनाची धग कायम आहे. या संदर्भात संसदीय मानवाधिकार समितीने आपला अहवाल नुकताच सार्वजनिक केला आहे. यात म्हटले आहे की, इराकमध्ये आंदोलनादरम्यान ३१९ जणांचा बळी गेला आहे.
राजधानी बगदादमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत बगदादमध्ये चार आंदोलक दगावले आहेत. अनेक शहरांमध्ये जाळपोळीचे प्रकार घडले आहेत. यात १५०० नागरिक जखमी झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.
इराकमधील जनता सरकारच्या कामकाजावर नाराज आहे. देशात महागाई गगनाला भिडली आहे. सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्या विरोधात आता जनता रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करीत आहे. या दरम्यान नागरिकांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
पंतप्रधान आदिल माहदी हे आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु त्यांचे प्रयत्न फारसे यशस्वी होताना दिसत नाहीयत. पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, या मागणीवर आंदोलक ठाम आहेत.