बिग ब्रेकिंग : महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबरपासून संपावर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Big Breaking : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी मिळावी, मानधनात वाढ व्हावी, या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सरकारकडे वारंवार मागणी करुनही या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याने ४ डिसेंबरपासून

महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची महिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा अॅड. निशाताई शिवूरकर यांनी दिली.

अंगणवाडी कर्मचारी सभेच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी सतत संघर्ष सुरु आहे. ४८ वर्षांपासून देशात एकात्मिक बाल विकास प्रकल्पा मार्फत महिला व बालकांसाठी अंगणवाड्या चालवल्या जातात.

बालकांचे आरोग्य, कुपोषण निर्मूलन, बाल शिक्षण, लसीकरण तसेच महिलांचे आरोग्य, गरोदपणातील काळजी, माता मृत्यू रोखण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी महत्वाचे काम करतात. अत्यंत अल्प मानधनावर या महिला काम करतात.

या महिलांना वेतनश्रेणी मिळावी, मानधनात वाढ व्हावी, अशी सतत मागणी सुरु आहे. गेल्या वर्षी सर्वोच न्यायालयाने या महिला सरकारच्या कर्मचारी आहेत. त्यांना ग्रॅच्युटी व अन्य लाभ मिळाले पाहिजे, असा निर्णय एका प्रकरणात दिला.

केंद्र व राज्य सरकार न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यास तयार नाही. त्याच प्रमाणे महागाई निर्देशांकाप्रमाणे मानधन वाढ देत नाही. कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईत जीवन जगणे मुश्कील झाले आहे.

अंगणवाडी सेविका व मिनी सेविकेला दरमहा २६ हजार रुपये व मदतनीसला दरमहा २० हजार रुपये मानधन मिळावे, वेतनश्रेणी, ग्रॅच्युटी मिळावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना मासिक पेंशन मिळावे, प्रति लाभार्थी बालकाला मिळणाऱ्या आहाराची रक्कम वाढवावी. आदी मागण्या या आंदोलनात केल्या आहेत.

शासनाला जाग आणण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या मासिक बैठकांवर बहिष्कार घालण्याचा आणि मासिक अहवाल न देण्याचाही निर्णय कृती समितीने जाहीर केला आहे. या आंदोलनात एकजुटीने सहभागी होवून संप यशस्वी करण्याचे आवाहन अॅड. निशाताई शिवूरकर, सत्यभामा तीटमे, भारती धरत, पुजा घाटकर, बेबी हरणामे यांनी केले आहे.