अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-शासकीय जागेत अतिक्रमण केल्याबद्दल मोमिन आखाडा (ता. राहुरी) येथील उपसरपंच रंजना सोपान शिंदे आणि सदस्य चंद्रकला दत्तात्रय कोहकडे व शेख अल्लाउद्दीन याकुब यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही कारवाई केली आहे. मोमिन आखाड्याचे सरपंच अशोक गेणू कोहकडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत विवाद अर्ज 27 /2020 दाखल केला होता.
त्यामध्ये उपसरपंच आणि दोन सदस्य यांनी गावामध्ये अतिक्रमण केल्यामुळे त्यांना अपात्र करावे, अशी मागणी केली होती. अर्जदार सरपंच अशोक कोहकडे यांच्या वतीने अॅड. योगेश गेरंगे यांनी युक्तिवाद केला.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 14 (ज)3 प्रमाणे शासकीय जागेवर अतिक्रमण करणे अथवा अतिक्रमण करून बांधकाम केल्यास ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्याची तरतूद आहे.
तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाकडील सिव्हिल अपिल नंबर 6832 /2018 जनाबाई विरुद्ध अतिरिक्त आयुक्त व इतर या प्रकरणाच्या निकालामध्ये अतिक्रमण या विषयावर सविस्तर विवेचन नोंदविलेले आहे.
या निकालाचा संदर्भ अॅड. गेरंगे यांनी दिला. उपसरपंच रंजना सोपान शिंदे, ग्रामपंचायत सदस्या चंद्रकला दत्तात्रय कोहकडे, शेख अल्लाउद्दीन याकुब यांनी ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 187/1, 187/2, 216, 220 यामध्ये अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले.
जिल्हाधिकार्यांनी हा युक्तीवाद ग्राह्य धरून दि.6 जानेवारी 2021 रोजी उपसरपंच आणि दोन सदस्यांना अपात्र ठरविले आणि त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.