अहमदनगर लाईव्ह 24 टीम: ओढ्यावरील पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामास धडकून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात कुकाणे -तरवडी मार्गावर कुकाणे शिवारात झाला.
त्यात राहुल राजू सरोदे (वय २४, तेलकुडगाव, ता. नेवासे) असे मृताचे नाव आहे. सुरू असलेल्या पुलाच्या कामाजवळ कसलाही सूचना फलक, परावर्तीत पट्ट्या नसल्याने ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा राहुल बळी ठरला. संबंधित ठेकेदार कंपनीच्या विरोधात या अपघाताने संताप व्यक्त केला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राजमार्ग ५२ ते शिरसगाव, गेवराई, कुकाणे, जेऊरहैबती, देडगाव, माका २९ किमी अंतराच्या रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गावरील सुमारे १९ पुलांची बांधकामे सुरू आहेत. काही ठिकाणी पुलांची कामे पूर्ण होण्यापूर्वीच बांधकामांना तडे जात असल्याने ही बांधकामे वादग्रस्त ठरत असतानाच शुक्रवारी कुकाणे-तरवडीच्या सीमेवर असलेल्या पुलाच्या बांधकामातील खड्ड्यात दुचाकीसह पडल्यानंतर बांधकामाच्या भिंतीवर डोके आदळल्याने राहुल जागीच ठार झाला.
मृत राहुल हा तरवडीहून कुकाण्याकडे दूचाकीने जात असता पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी लगतच्या शेतातून ठेकेदार कंपनीने पर्यायी रस्ता काढून दिला. मात्र त्या ठिकाणी कसलाही सूचना फलक लावलेला नाही. तसेच रात्रीसाठी कसल्याही रेडियम पट्ट्याही बसवलेल्या नसल्याने दुचाकीस्वार थेट पुलाच्या बांधकामास धडकला.
शिरसगाव ते माका हा मार्ग कुकाण्यातून जातो. मात्र या मार्गावरील सर्वच पुलांच्या कामांच्या ठिकाणी संबंधीत ठेकेदार कंपनीकडून प्रवाशांच्या जिविताची काळजी घेण्यासाठीच्या उपाययोजनांचा अभाव आहे.
जागोजागी मातीचे, मुरूमाचे व खडीचे भराव रस्त्यात टाकणे, रुंदीकरण करताना काही ठिकाणी जागा सोडून देणे, रस्ते खोदून काढणे मात्र पर्यायी मार्ग न देणे असे प्रकार सुरू आहेत. ठेकेदार कंपनीच्या मनमानीपणाचा या कामात कळस झाला. त्यात आतापर्यंत अनेकांना अपघात घडून अंपगत्वही आले.या मार्गावरील अपघातात ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणाचा हा दुसरा बळी ठरला आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com