कोपरगाव :- राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर कुणी किती माया गोळा केली, याची माहिती गोळा करून जनतेपर्यंत नेणार आहे.
पक्ष शिस्तीच्या नावाखाली दडपशाही करणाऱ्या नेत्यांना जमिनीवर आणण्याचे काम प्रामाणिक कार्यकर्ते करतील, असा इशारा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी भाजपच्या नेत्यांना दिला.
नगराध्यक्ष वहाडणे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, संघ, जनसंघ व भाजपचा स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे पक्षवाढीसाठी काम केले.
पण भाजपत काही जण स्वतःच्या संपत्तीत भर घालण्यात मग्न आहेत. साडेचार वर्षांत दिवाळे काढणाऱ्यांनी पक्ष आमदार मंडळींकडे गहाण टाकला.
नगराध्यक्षपदी महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आल्यानंतर या प्रवृत्ती भानावर येतील, असे वाटले होते.
नगर परिषदेचे काम करत असताना अडथळे आणणाऱ्या व त्यांना साथ देणाऱ्या जिल्ह्यातील सर्वांनाच येणाऱ्या काळातही सद्बुद्धी येईल, असे वाटत नाही.
मला तर पक्षाचे कुठलेच बंधन नसल्यामुळे मी निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. कार्यकर्त्यांचे, जनतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रेम आहे.
पण पक्षात लुटारूंची टोळी तयार नेतेगिरी करणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.