अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- सुप्रसिद्ध गझलकार आणि महाकवी म्हणून ओळख असलेले इलाही जमादार यांचे आज सकाळी निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गझलकार इलाही जमादार यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे.गेल्या अनेक दिवसांपासून इलाही जमादार आजाराने त्रस्त होते. त्यांच्या जाण्याने गझल विश्वात शोककळा पसरली आहे. इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 रोजी त्यांचा सांगलीतील दुधगावमध्ये झाला.
1964 पासून त्यांनी कविता लेखनास सुरुवात केली. लिखानात जादू आणि कवितेविषयीच्या जाणीवेमुळे त्यांनी अत्यंत कमी काळात कविता आणि गझलक्षेत्रामध्ये आपले नाव कमावले. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी आहेत.
विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. ते गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळा घ्यायचे. इलाही जमादार यांनी अनेक कविसंमेलने व मुशायरे यात भाग घेतला आहे.
इलाही जमादार यांचे महाराष्ट्रतील अनेक शहरांत आणि व महाराष्ट्राबाहरील इंदूरमध्ये स्वतंत्र काव्यवाचनाचे व मराठी ग़ज़लांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम करायचे. इलाही यांनी ‘जखमा अशा सुगंधी’ आणि ‘महफिल-ए-इलाही’ या नावांचे मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कर्यक्रम केले आहेत.