अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-सोमवारी (दि. 30) रात्री पावणेआठच्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात सामाजिक कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आलेली आहे. त्यावेळी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने त्यांच्या सोबत होत्या. त्यांचा जबाब बाकी असल्याचे पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी माध्यमांना सांगितले होते.
त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र, त्यांचा मोबाईल बंद असल्याने वेगळ्याच शंका उपस्थित झाल्या होत्या.रेखा जरे हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने यांचीही पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी रात्री हत्या झाली, तेव्हा मानेही त्यांच्यासोबत कारमध्ये होत्या.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडाच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या व त्यांच्या कार मध्ये असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने यांची आज पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.रेखा जरे हत्याकांडाच्या प्रत्यक्ष साक्षीदार विजयमाला माने यांनी आज धक्कादायक खुलासा केला आहे.त्यांनी आज पोलिसांत जबाबसाठी हजेरी लावली.यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. घटना कशी घडली, हे देखिल सांगीतले. मात्र आपल्या जीवीताला धोका असल्याने पोलीस संरक्षणाची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, रेखा जरे यांच्या खून कसा झाला? संशयित आरोपींनी त्यांचे वाहन कसे अडविले? कट मारल्याचा वाद कसा घातला व मला समजायच्या आत गळ्यावर चाकू कसा मारला? या संदर्भात सविस्तर माहिती माने यांनी जबाबात दिली आहे. त्यासोबतच त्या दिवशी मी माझ्या कामासाठी व जरे यांच्या वैद्यकीय कामासाठी पुण्याला गेलो होतो, अशी माहिती त्यांनी दिली.
‘त्या दिवशी आम्ही पुण्यावरून येत होतो. रेखा जरे यांचा पाय दुखत होता, म्हणून त्यांनी सुरुवातीला मला कार चालवण्यास सांगितली होती. मात्र त्यांच्या मुलाने नंतर रेखा जरे यांना कार चालवण्यास सांगितले. त्यानुसार रेखा जरे यांनी कार चालवली. जातेगाव घाट येथे आमच्या कारसमोर दुचाकी आडवी घातली गेली. दुचाकीवर दोघे होते. कट का मारला? अशी विचारणा करत रेखा जरे यांच्याशी ते दोघे वाद घालायला लागले.
त्याचवेळी मला एक फोन आला, मी फोनवर बोलत होते. त्यांनी जरे यांना मागे ढकलले आणि वार केले. हे पाहून कारमध्ये बसलेल्या त्यांच्या आई जोरात ओरडल्या. त्यावेळी मी जरे यांच्याकडे पाहिले. तेव्हा मला धक्काच बसला. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. मी सुरूवातीला १०० क्रमांकावर फोन केला, पण तो लवकर लागेना. त्यानंतर मी मॅडमला दवाखान्यात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
लगेच रेखा जरे यांना त्यांच्या मुलाने व मी कारमधील दुसऱ्या सीटवर शिफ्ट केले व मी कार चालवायला घेतली. गाडी सुपा टोल नाक्यावर आणली. तेथे रुग्णवाहिका आली होती. या रुग्णवाहिकेत रेखा जरे यांना शिफ्ट करून जिल्हा रुग्णालयात आणले,’ अशी माहिती माने यांनी दिली. हा सर्व घटनाक्रम सांगताना माने यांचे डोळे पाणावले होते. दरम्यान, पोलिसांनी आज, त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.
दरम्यान रेखा जरे यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. यामध्ये गळा चिरुन हत्या झाल्याचे समोर आले आहे. तसेच जरे यांच्या खांद्याजवळही जखम झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. रेखा जरे यांची हत्या करण्यासाठी वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र अद्यापही जरे यांच्या हत्येचं खरं कारण समोर आलं नाही. त्यामुळे मुख्य सूत्रधार असलेला पत्रकार बाळासाहेब बोठे याला पोलीस कधी अटक करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved