शेतातून घरी येणाऱ्या महिलांना बिबट्या दिसतो तेव्हा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अकोले : शेतातील कामे करून घरी जात असताना रस्त्यात बिबट्या बसलेला दिसताच मजूर महिलांची चांगलीच धांदल उडाल्याने त्यांनी धूम ठोकली. ही घटना राहाता तालुक्यातील राजुरी येथील जुन्या गावातील गयबवली बाबा मंदिराजवळ घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, राजुरी व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून तीन ते चार बिबट्यांचा बछड्यांसह मुक्तसंचार आहे. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्या व त्याचे बछडे अनेकदा निदर्शनास आले आहे.

दोनच दिवसांपूर्वी शेतातील कामे उरकून काही महिला घरी निघून गेल्या होत्या. त्यातील दोन महिला या उशिरापर्यंत शेतात काम करीत असताना संध्याकाळी काम आटोपल्यानंतर त्या सात वाजण्याच्या दरम्यान घरी जात असतानाच रस्त्यात बिबट्या बसलेला दिसला.

त्यांना अगोदर कुत्रे असल्याच्या संशय आल्यामुळे त्यांनी त्याला हाड हाड म्हणून आरोळी दिली. परंतु, तो बिबट्या असल्याचे लक्षात येताच त्यांनी तसेच मागे वळून पळत जाऊन जवळच असणाऱ्या मंदिराचा आश्रय घेतला.

त्यानंतर त्यांनी आपल्या घरच्यांना फोन करून मंदिराच्या दिशेने बोलावून घेतले. त्यानंतर त्या दोन महिला आपल्या घरच्या व्यक्तींसमवेत घरी गेल्या.

तसेच राजुरी गावापासून जाणाऱ्या चार मोऱ्या प्रवरा डावा कालव्या शेजारून जाणाऱ्या रस्त्यामध्ये शिवाजी सकाहरी गोरे कामावरून संध्याकाळी घरी जात असताना त्यांनाही पाटाच्या कडेला बिबट्या आडवा गेला असल्याचे त्यांनी सांगितले.

राजुरी व परिसरातील अनेक भागात शेतकऱ्यांना व शेतमजुरी करणाऱ्यांना दिवसा व रात्री तीन ते चार बिबटे व बछडे नजरेस पडत असल्याने भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24