शिवसेनेतील फुटीरवादी कोण? याचे आत्मपरीक्षण करा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  एकेकाळी शहरात दिवंगत नेते अनिल भैय्यांच्या शिवसेनेचा असलेला बोलबाला आता पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे डळमळू लागला आहे.

गेल्या एकही दिवसांपासून शिवसेनेतील गटबाजीचे किस्से आता चांगलेच रंगू लागले आहे. पक्षातील विषय चव्हाटयावर बाहेर येऊ लागल्याने नगरकरांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेत जातीयवादाला थारा दिला जात नाही. पक्षाकडून स्व. अनिल भैय्या राठोड व शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी दिलेली नावेच स्वीकृतसाठी निश्चित करण्यात आली.

काका शेळके यांनी त्यावेळेस का विरोध केला नाही? असा सवाल करत त्यांचा विरोध हा फक्त मराठा समाजसाठीच आहे, असा आरोप नगरसेवक गणेश कवडे यांनी केला आहे. संपर्क प्रमुखांच्या बदलीबाबत शेळके यांचा बोलविता धनी कोण, शिवसैनिक व नगरकरांना माहिती आहे.

दरम्यान, शहरप्रमुख बदलासाठी श्रेष्ठींकडे मागणी केलेली असल्याचेही कवडे यांनी स्पष्ट केले आहे. स्वीकृत सदस्य निवडीवरुन सावेडी विभाग प्रमुख शेळके यांनी जातीयवादाचा आरोप केला होता. त्याला नगरसेवक कवडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कवडे यांनी म्हटले की,

दुसर्‍या पक्षातून शिवसेनेत आलेले काका शेळके व पक्षातील काही पदाधिकार्‍यांनी ‘फुटीरवादी’ कोण आहे, याचे स्वतःच आत्मपरीक्षण करावे. सावेडी विभागप्रमुख झाल्यापासून सावेडी विभागात संघटनेसाठी केलेल्या कामाचा त्यांनी खुलासा करावा. सावेडी विभागाची परिस्थिती पाहता तेथे शाखाप्रमुख व कुठलीही कार्यकारणी अद्याप नेमणूक केली नाही.

याकडे दुर्लक्ष करत फक्त जातीयवाद करुन पक्षात व समाजात तेढ निर्माण करायचे एवढेच कामे करण्यात पुढाकार घेतात, असे कवडे यांनी म्हटले आहे. पक्षातील काही जणांकडून मनमानी चालू संपर्कप्रमुख व शहरातील नगरसेवक हे वरिष्ठांचे आदेश पाळणारे एक सच्चे शिवसैनिक आहेत.

आजवर संघटना वाढीसाठी वेळेवेळी आम्ही एकजुटीने प्रयत्न केले आहेत. परंतु शिवसेना शहरप्रमुख व त्यांच्या गटातील काही नगरसेवक व पदाधिकारी हे त्यांची मनमानी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचेच निर्णय अंतिम मानतात. त्यात ते स्थानिक पातळीवर पक्षातील इतर नगरसेवक व कार्यकर्ते यांचे मत विचारात घेत नाहीत.

यासर्वांबाबत शहरप्रमुख कुठलीही कठोर भूमिका घेत नाहीत, असा आरोपही कवडे यांनी दिलीप सातपुते यांच्यावर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाप्रमुख व शहरप्रमुख यांच्याकडे सदस्य नोंदणी फॉर्मची मागणी केली असता ते उपलब्ध करून दिले नाहीत. जाती-पातीचे राजकरण दुसर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून करतात.

त्यांच्या या वागणुकीमुळे आम्ही नगरसेवक व पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेऊन शहरप्रमुख बदलीची मागणी करणार आहोत. मागणीबाबत पत्राद्वारे पक्षश्रेष्ठींशी बोलणी झाली असल्याचेही कवडे यांनी म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24