लाकडी दांडक्याने मारहाण करून पत्नीचा खून ! नंतर रचला असा काही बनाव…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- घरघुती वादातून पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण करून तिचा खून केला. वर्षा सुनील जाधव (वय 22 रा. वनकुटे ता. पारनेर) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.

ही घटना नगर तालुक्यातील विळद पिंप्री शिवारात 27 जुलै रोजी घडली. पतीने वर्षा अपघातात जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा डाव रचला होता. परंतु, पोलिसांनी केलेल्या तपासात वर्षाचा खून झाला असल्याची बाब समोर आली. एमआयडीसी पोलिसांनी सुनीलला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील व वर्षा विळद परिसरात राहत होते. 20 जुलै रोजी वर्षा, सुनील व आणखी एक व्यक्ती दुचाकीवरून पारनेर तालुक्यात गेले होते. वनकुटे रोडवर त्यांचा अपघात झाला. या अपघातात तिघे किरकोळ जखमी झाली होती.

27 जुलैला सुनीलने दारू पिऊन वर्षाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या वर्षाला सुनील याने पुणे येथील ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान वर्षाचा मृत्यू झाला. ससून रूग्णालयातील डॉक्टरने याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तपासकामी सदरचा गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात वर्ग झाला. पोलीस हवालदार गायकवाड या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांच्या लक्षात आले की, वर्षाला मारहाण झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. गायकवाड यांनी सखोल तपास केला. पती सुनील याच्याकडे कसून चौकशी केली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तोंड उघडले.

त्याने सांगितले की, पत्नी वर्षा भिक्षा मागत होती. भिक्षा मागायला माझा विरोध होता. याच कारणातून 27 जुलै रोजी दारू पिऊन वर्षाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या वर्षाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. स्वत: गायकवाड यांनी फिर्याद दाखल करत सुनील याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24