अहमदाबाद :- शहरात डास चावल्याने त्रस्त झालेल्या पत्नीने रागाच्या भरात पतीला मुसळाने बदडले असल्याची घटना घडली आहे. यात पतीला जबर मार लागला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याच्या उजव्या डोळ्याजवळ सात टाके टाकण्यात आले आहेत.
या घटनेत मुलीने देखील आईला साथ दिली असल्याचे वृत्त आहे. अहमदाबादमधील नरोदा भागात भूपेंद्र लेऊआ आपल्या कुटुंबासमवेत राहतो. एलईडी विकून चरितार्थ चालवणाऱ्या भूपेंद्रच्या घरी उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने तो दोन महिन्यांपासून लाईट बिल भरू शकलेला नव्हता.
परिणामी घरात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला होता. बुधवारी घरात पंखा नसल्याने मच्छर खूप चावतात, अशी तक्रार पत्नी संगीता हिने केली असता, भूपेंद्रने गमतीच्या स्वरात ‘तू माझ्या बिछान्यावर झोपली असतीस तर डास चावले नसते’ असे म्हटले;
परंतु यामुळे संगीताचा पारा आणखी वाढला आणि संतप्त संगीताने मुसळ घेऊन पतीला बदडण्यास सुरुवात केली. यावेळी भूपेंद्रच्या मुलीने म्हणजे चितलनेदेखील कपडे धुण्याच्या धोपटण्याने वडिलांची धुलाई करत आईला साथ दिली. या मारहाणीत भूपेंद्र गंभीर जखमी झाला आहे.
या भांडणाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी त्याचा भाऊ महेंद्र याला बोलावले. महेंद्रने या दोघींच्या तावडीतून त्याची सुटका करून उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. या मारहाणीत भूपेंद्रच्या उजव्या डोळ्याला जखम झाली असून सात टाके पडले आहेत. भूपेंद्रने पत्नी व मुलीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.