Ahmednagar Breaking : चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी पहार डोक्यात घालून पत्नीचा खून करणाऱ्या व हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एकाला जखमी करणाऱ्या आरोपीस येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. कुलकर्णी यांनी ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बाळासाहेब तुळशिराम फटांगरे (रा. लक्ष्मीनगर, संगमनेर) हा सात वर्षांपूर्वी त्याच्या राहत्या घरात पत्नी वैशाली उर्फ छाया बाळासाहेब फटांगरे ( वय ३५) हीस चारित्र्याच्या संशयावरुन लोखंडी पहारीने मारहाण करत होता.
यावेळी भानुदास लालु गुंजाळ (रा. गुंजाळवाडी, संगमनेर) हे वैशाली हिला सोडविण्यासाठी मध्ये पडले होते. बाळासाहेब फटांगरे याला त्याचा राग आला. त्याने रागाच्या भरात हातातील लोखंडी पहार त्याची पत्नी वैशाली हिच्या डोक्यात मारुन तिला गंभीर जखमी केले.
तसेच भानुदास गुंजाळ याला लोखंडी पहारीने डोक्यात मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत वैशाली फटांगरे हिचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तपासी अधिकारी सहाय्यक फौजदार विजय सरवदे यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयासमोर दोषारोपपत्र सादर केले होते. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. कुलकर्णी यांच्या समोर झाली.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जयंत दिवटे यांनी एकुण १५ साक्षीदार पडताळले. न्यायालयासमोर आलेला पुरावा आणि सरकारी पक्षातर्फे केलेला युक्तीवाद ऐकून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश कुलकर्णी यांनी या खटल्यात आरोपी बाळासाहेब तुळशिराम फटांगरे (रा. लक्ष्मीनगर, संगमनेर) यास शिक्षा ठोठावली.
भादंवि कलम ३०२, ३०७, ३०४ अन्वये आरोपीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि ५ हजार रुपयांचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास दीड महिना साध्या कारावासाची शिक्षा तसेच भारतीय दंड विधान, १८६० चे कलम ३२६ अन्वये सात वर्षे सश्रम शिक्षा आणि ५ हजार रुपयांचा दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास दीड महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.