ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : सहा वर्षांपासून फरारी महिलेला पुण्यात अटक !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmadnagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणात गेली सहा वर्षे फरारी असलेल्या आरोपी महिलेला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (सीआयडी) पुण्यात अटक केली. ती पुण्यातील एका खासगी कंपनीत गेली सहा वर्षे काम करत असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे.

पंचायत समितीच्या निवडणुकीत १२ फेब्रुवारी २०१७ महिला उमेदवाराने आयोजित केलेल्या पार्टीत दारू पिल्याने नऊजणांचे बळी गेले. तसेच, या प्रकरणात १३ जणांची प्रकृती गंभीर बनली होती.

त्यापैकी एकाला अर्धांगवायूचा झटका आला होता आणि एकाला अंधत्व आले. या प्रकरणातील फरारी असलेल्या भाग्यश्री गोविंद मोकाटे (रा. इमामपूर, जि. अहमदनगर) हिला पुण्यातून अटक करण्यात आली.

मोकाटे आणि मंगला महादेव आव्हाड या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार होत्या. त्यांनी निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी पांगरमल गावात (ता. नगर) पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी विषारी दारू पिल्याने नऊजण दगावले. या निवडणुकीत आरोपी मोकाटे विजयी झाली होती. गेली सहा वर्षे ती फरारी होती.

मोकाटे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. तसेच, तिला अटक करण्यासाठी विशेष न्यायालयाने वॉरंट बजावले होते. याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला होता.

ती पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोकाटेला पकडले. पोलीस अधीक्षक पल्लवी बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद रावडे, हवालदार विकास कोळी, सुनील बनसोडे, उज्ज्वला डिंबळे यांनी ही कारवाई केली.

या दारूकांड प्रकरणाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली होती. आरोपी भाग्यश्री मोकाटेसह १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपींपैकी दोघांचा मृत्यू झाला असून १७ जणांना अटक केली आहे.

Ahmednagarlive24 Office