रिकामे हांडे घेऊन महिलांचा पाण्यासाठी आक्रोश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-भिंगार येथील इंदिरानगर भागात राहणार्‍या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक नळाची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी कॅन्टोमेंट कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

पाणी देता का? पाणी! च्या घोषणा देत महिला रिकामे हांडे घेऊन, तर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. इंदिरानगर येथे मोठी लोकवस्ती असून, अनेक नागरिक वास्तव्यास आहे. या भागात सार्वजनिक नळ नाही. तेथे आधीचा असलेला जुना नळ बर्‍याच वर्षांपासून बंद आहे.

तेथील महिला व लहान मुले पाण्यासाठी लांब पायपीट करतात. पिण्याचे पाणी नसल्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

इंदिरानगर ही मागासवर्गीय लोकांची झोपडपट्टी असल्याने एक वर्षापासून निवेदन देऊन सुध्दा जाणीवपुर्वक त्यांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी सार्वजनिक नळ दिले जात नसल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे. सदर मागणीसाठी दहा महिन्यांपूर्वी निवेदन देऊन देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही.

मात्र आता तातडीने इंदिरानगर भागात राहणार्‍या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक नळाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रश्‍न येत्या पंधरा दिवसात न सुटल्यास कॅन्टोमेंट कार्यालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24