अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावू लागला आहे.
यातच गावागावातिल राजकारणे, भावकीचा वाद, या गोष्टींना फाटा देत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा हि मागणी काही पुढाऱ्यांनी केली आहे.
यासाठी विकासात्मक निधीचे आश्वासने देण्यात येत आहे. याला आता नागरिकांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.
जामखेड तालुक्यात अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी आदर्श गाव सारोळा, आपटी, खुरदैठण, पोतेवाडी व वाकी या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.
कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. सारोळा ग्रामपंचायत मागील पंचवार्षिकमध्येही बिनविरोध झाली होती. मराठी भाषिक संघटनेचे अध्यक्ष युवराज काशीद यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न केले.
तसेच आपटी ग्रामपंचायत तीस वर्षांपासून बिनविरोध होत आहे. तर खुरदैठणमध्ये महादेव डुचे व राष्ट्रवादीचे शहाजी डुचे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ७ जागा बिनविरोध निवडून आल्या. पोतेवाडी व वाकी ग्रामपंचायतही बिनविरोध झाली.