श्रीरामपूर :- शहरातील शिरसाठ हॉस्पिटलजवळ रहाणार्या महिलेचा खून करून एका तरुणाने स्वतः आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील इराणी गल्ली येथे घडली.
नीता हौशाराम गोर्डे (वय 42 रा. शिरसाठ हॉस्पिटलजवळ, वॉर्ड नं. 1) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून गणेश राधाकृष्ण दळवी (वय 31, रा. शिरसाठ हॉस्पिटलजवळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
खुनाचा गुन्हा दाखल
याबाबत चंद्रकला शंकर थोरात (वय 52, रा. शिरसाठ हॉस्पिटलजवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश दळवी याच्या विरोधात शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सुर्याचा घाव लागल्याने जागेवरच मृत्यू.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत नीता गोर्डे व गणेश दळवी हे गेल्या काही महिन्यांपासून चंद्रकला थोरात यांच्या खोल्यांमध्ये भाडेकरी म्हणून राहत होते. शनिवारी संध्याकाळच्यावेळी या दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाले होते.
भांडणा दरम्यान आरोपी गणेश याने नीतावर लोखंडी सुर्याने वार केले. तिच्या हात, पाय, पोटावर जबर जखमा झाल्या. सुर्याचा घाव वर्मी लागल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला.
हाताची नस कापून आत्महत्या
नीताचा मृत्यू झाल्याचे पाहून गणेशने त्याच सुर्याने स्वतःच्या अंगावर वार केले.तसेच हाताची नस कापून आत्महत्या केली. घटनेनंतर काही वेळाने रस्त्याने जाणार्या एकाने गणेशचा मृतदेह पाहिला.
त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. नाजूक कारणातून ही घटना घडल्याचे कळते.