अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदावर अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या राजश्री घुले व कॉंग्रेसचे प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड झाली. आता जिल्हा परिषद समित्यांच्या सभापती निवडी मंगळवारी,दि.7 होणार आहेत.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस,इंदिरा कॉंग्रेस,शिवसेना व क्रांतीकारी शेतकरी पक्ष या चार पक्षांना प्रत्येकी एक याप्रमाणे चार समित्या दिल्या जाणार आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मुंबईत होणार असून यात या निवडी केल्या जाणार आहे.
राष्ट्रवादी व कॉंग्रेसला अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपद देण्यात आले.त्याचबरोबर महाविकास आघाडीतील चारही पक्षांना प्रत्येकी एक याप्रमाणे चार विषय समित्या दिल्या जाणार आहेत. शिवसेनेने अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाधिकारी निवडीपूर्वी क्रांतीकारी शेतकरी पक्ष आमचा सहयोगी असून आमचे सात व त्यांचे पाच असे बारा सदस्यांचे संख्याबळ आहे.
त्यामुळे आम्हाला उपाध्यक्षपद व अर्थ,बांधकाम समिती द्या अशी मागणी केली होती. मात्र उपाध्यक्षपद कॉंग्रेसला देण्यात आल्याने आता अर्थ समितीवर शिवसेनेची नजर आहे. शिवसेनेकडून या समितीसाठी संदेश कार्ले वा गटनेते अनिल कराळे यांची वर्णी लागु शकते. क्रांतीकारी शेतकरी पक्षालाही अर्थ,बांधकाम समिती गटनेते सुनील गडाख यांच्यासाठी हवी आहे.
पण ती सेनेला देवून गडाख यांना कृषी व पशुसंवर्धन समिती दिली जाईल असा राजकीय वर्तुळाचा अंदाज आहे. महिला व बालकल्याण समिती कॉंग्रेसकडे राहणार असून त्या जागेवर संगमनेरच्या थोरात समर्थक मीराताई शेटे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
तर समाजकल्याण समिती राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असून तेथे पुन्हा विद्यमान सभापती उमेश परिहर इच्छुक आहेत. त्याचबरोबर कोपरगावच्या आमदार आशुतोष काळे समर्थक सोनाली उबाळे यांचाही या समितीसाठी विचार होवू शकतो. असे असले तरी मुंबईत या चारही पक्षाची बैठक होणार आहे.त्यात अंतिम निर्णय होईल असे सांगण्यात येत आहे.