अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : अकोले तालुक्यातील गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना हाताशी धरून गैरव्यवहार केलेला आहे. या प्रकरणी त्वरीत चौकशी व्हावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने रजेवर पाठवावे अन्यथा दि.१९ डिसेंबरपासून आपण जिल्हा परिषदेसमोर उपोषण करणार आहे.
असे निवेदन जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.
या निवेदनात दराडे यांनी म्हटले आहे की, अकोले पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील काही ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना हाताशी धरून गैरव्यवहार केलेला आहे.
या संदर्भात आपण जिल्हा परिषद प्रशासनाला पुरावेही सादर केलेले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. ही चौकशी होत असताना संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणे गरजेचे आहे. परंतु त्यांना रजेवर पाठविले जात नाही.
ते जर या पदावर कार्यरत राहिले तर चौकशीमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवा.
त्यांना रजेवर न पाठविल्यास आपण दि.१९ डिसेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर अमरण उपोषणास बसणार आहे, असा इशारा दराडे यांनी या निवेदनात दिला आहे.