अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  सरकारी कार्यालये म्हंटले कि लाचखोर हे आलेच. सरकारी अधिकारी झाले कि जनतेची कामे झाली नाही तरी चालेल मात्र लाच स्वीकारणे हे काम अनेक लाचखोर अगदी प्रामाणिकपणे करतात.

मात्र अशा लाचखोरांवर केवळ तात्पुरती कारवाई होत असल्याने पकडले गेले तरी काही दिवसांनी आपण पुन्हा कार्यात रुजू होऊन आपले हे काम सुरुच ठेऊ असा मानस काही कर्मचारी ठेवतात.

यामुळेच जिल्ह्यात करोनाच्या काळात देखील सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लाच घेण्याचे काम जोरात सुरू होते. याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दोन वर्षातील कारवाईतून दिसून येते आहे.

यामुळे जिल्हा लाचखोरीत देखील सुसाट होता हे दिसून येते. सन २०२० व २०२१ या दोन वर्षांत ६७ सापळा कारवाईमध्ये ८५ व्यक्तींविरूध्द लाच घेणे, लाच मागितल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यामध्ये सर्वाधिक लाचखोरी जनतेचा थेट संपर्क असलेल्या पोलीस आणि महसूल विभागात दिसून आली. दरम्यान सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर खासगी व्यक्तीही लाचेच्या जाळ्यात आहेत. गेल्या दोन वर्षांत पोलीस दलातील २० सापळा कारवाईत २४ पोलिसांविरूध्द लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला.

महसूलच्या १६ सापळा कारवाईत १४ व्यक्ती लाच घेताना पकडल्या. त्यांना लाच घेण्यात मदत करणाऱ्या सात व्यक्तींवरही लाचलुचपत विभागाने गुन्हे दाखल केले आहेत.

पोलीस, महसूल पाठोपाठ विद्युत, आरोग्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती, वस्तू व सेवा कर, मनपा, पाटबंधारे, भुमी अभिलेख, शिक्षण खाते, सहकार खाते, वन विभाग, जात पडताळणी आणि नगरपरिषदेत लाचखोरी सुरू असल्याचे लाचलुचपतने केलेल्या कारवाईतून समोर आले आहे.