अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- भरधाव वेगातील बुलेट मोटारसायकल व स्विफ्ट कारच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती पत्नी ठार झाले.(Ahmednagar Accident news)

ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नगर – दौंड महामार्गावरील विसापूर फाटा शिवारात घडली. यात महंमद शफी शाफुद्दिन शेख (वय ५०) व शबाना महंमद शफी शेख (वय ४५) अशी त्या मृत दाम्पत्याची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोणी व्यंकनाथ येथील शेख हे पत्नीसोबत दुचाकीवरून नगरच्या दिशेने जात असताना विसापूर फाट्याजवळ नगर कडून दौंडच्या दिशेने जाणाऱ्या विना नंबरच्या स्विफ्ट डिझायर चारचाकी गाडीची जोराची धडक झाली.

या धडकेत बुलेट गाडी वरील शबाना महंमद शफी शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर महंमद शफी शेख यांचा रुग्णालयात नेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिसांनी धाव घेऊन जखमी महंमद शफी शेख यांना दवाखान्यात दाखल केले. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात विना नंबरच्या स्विफ्टच्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला.