अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- सहकारी संस्थांनी लेखापरीक्षण पूर्ण करून ताळेबंद निश्‍चित करून सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून सभासदांसमोर मांडणे अपेक्षित असते. मात्र, लेखापरीक्षण पूर्ण नसताना घाई गडबडीने सभा बोलवून सभेत छुपे ठराव पास करण्याचा संचालक मंडळाने घाट घातला आहे.

त्यामुळे पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेने 30 सप्टेंबर 2021 रोजी आयोजीत केलेली ऑनलाईन वार्षिक सभा सभासदांची दिशाभूल,फसवणूक करणारी व नियमबाह्य असून ती रद्द करावी अशी मागणी सभासद बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी यांच्या सह अन्य सभासदांनी सहकार आयुक्तांकडे केली आहे.

सभासदांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचा 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 चे लेखापरीक्षण सुरु आहे. असे असताना व शासनाने ही वार्षिक सभा घेण्यास 31 मार्च 2022 पर्यंत मुदत वाढ दिली असताना केवळ नियमबाह्य केलेला खर्च मंजूर करणे,

राज्य शासनाने सर्व संभासदाना संचालक मंडळाच्या होणार्‍या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र ठरवले आहे. याबाबत वार्षिक सभेत नियमबाह्य ठराव मंजूर करून संभासदाच्या अधिकारावर गदा आणणे. संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहारामुळे सहकार आयुक्तांनी कलम 83 अन्वये चौकशी झाली आहे.

त्याचा अहवाल येन्याआधीच करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मिळालेल्या मुदतवाढीचा गैरफायदा घेत संचालक मंडळाने सभासदांच्या हिताला बाधा आणणार्‍या निर्णयांना वार्षिक सभेत मंजुरी घेण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बँकेने सभासदाना वार्षिक अहवाल बँकेतिल प्रत्येक शाखेत उपलब्ध होतील असे, जाहीरातीत सांगितले आहे. मात्र 25 तारखेपर्यंत कसलाही अहवाल शाखेत उपलब्ध केला नाही, तसेच सभासदाना कसलीही माहिती विचारायची असल्यास लेखी मागण्या मांडाव्यात मात्र, यालाही कमी अवधी ठेवला आहे.

लेखापरीक्षण अहवाल प्राप्त नसल्याने व राजकीय हेतू साध्य करण्यासाठी संचालक मंडळाचा वार्षिक सभा घाई घाईत उरकून घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी यांनी पत्रात केला आहे.