अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- जनावरांच्या लिलावासाठी आमचा तीव्र विरोध आहे. शहरातील मोकाट जनावरे गाय, बैल,म्हैस आपण पिंपळगाव माळवी या जागेत ठेवली आहेत.

याचा मनपाला काही त्रास नाही पण त्यांचा सांभाळ करण्यासाठी कोणत्याही गडगंज निधीची गरज नसताना तुम्ही ही जनावर सांभाळू शकत नाही हे दुर्दैव आहे. २०/२५ जनावरांच्या पैश्यातून काय मिळवणार आहात? या लिलावाच्या जाहिराती पेक्षा कोणी या जनावरांचा सांभाळ करणारी संस्था असेल तर संपर्क साधा.

या आशयाची जाहिरात असती तर आम्हाला अभिमान वाटला असता. या प्रकारे मनपाने मोकाट जनावरांचा लिलाव करणं चुकीचे आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार कोणतीही संस्था किंवा व्यक्ती कोणत्याही प्राण्यांची खरेदी अथवा विक्रीसाठी ऑफर (लिलाव) देऊ शकत नाही हा लिलाव बेकायदेशीर आहे.

या लिलावातील जनावरे खुलेआमपणे खटकाला जाणार आणि या गाई, बैलांची कत्तल होणार हे जगजाहीर आहे. एवढं न कळायला एवढे दुधखुळे आम्ही नाही. महानगरपालिकेची ७०० एकर जागा पिंपळगाव माळवी या ठिकाणी आहे.

जर महानगरपालिकेने ३/४ एकर मध्ये गोशाळा उभारली तर भारतातील पहिली गोशाळा नगर मनपाची असेल, शिवाय मनपाला यातून उत्पन्नदेखील तयार होऊ शकतो. या लिलावावर योग्य तोडगा निघेपर्यंत हा लिलाव रद्द करण्यात यावा. आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा लिलाव होऊ देणार नाही.

२ दिवसात आपण मला या बाबत लेखी खुलासा न केल्यास हा लिलाव रद्द न केल्यास. ज्या ठिकाणी लिलाव होणार त्या ठिकाणी मी आत्मदहन करणार आहे.

यात माझा जीव गेला तरी या प्रकारे कोणताही लिलाव होऊन मुक्या जनावांची कत्तल होऊ देणार नाही. असा इशारा निवेदनाद्वारे अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पठारे यांना वाघ्या फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिला आहे .