Car Care : देशात महागाई (inflation) वाढत चालली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel) दर शंभरी पार गेले आहेत. त्यामुळे अनेकजण सीएनजी (CNG Car) किंवा इलेक्ट्रिक कार वापरत आहेत. मात्र सीएनजी कार वापरत असताना खबरदारी बाळगावी लागते. अन्यथा अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात.

गेल्या काही वर्षांत देशात सीएनजी कारचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. याचे कारण पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती असल्याचे मानले जात आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा सारख्या मोठ्या कंपन्यांसह देशातील अनेक कार कंपन्या त्यांच्या कारमध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी किटचा पर्याय देतात.

सीएनजी वाहनांमुळे तुमचा इंधनाचा खर्च नक्कीच कमी होतो, पण त्यातील तुमच्या काही चुकांमुळे तुमचे मोठे नुकसानही होऊ शकते. म्हणूनच आज तुम्हाला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही CNG कारमध्ये अजिबात करू नये.

या गोष्टी लक्षात ठेवा

सीएनजी वाहनांचे अनेक फायदे आहेत. एक, ते अधिक मायलेज देते, तसेच CNG ची किंमत देखील पेट्रोल डिझेलपेक्षा कमी आहे आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे पर्यावरणाला जास्त नुकसान होत नाही.

परंतु यामध्ये नेहमीच धोका असतो, जो गॅस गळतीशी (Gas leak) संबंधित असतो. कारण अशा घटना या वाहनांमध्ये अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. अनेकदा लोक कारमध्ये बसून धुम्रपान करतात आणि गॅस गळती झाल्यास ते घातक ठरू शकते.

त्यामुळे जेव्हाही तुम्ही सीएनजी कारमधून प्रवास करता तेव्हा तुम्ही किंवा तुमच्यासोबत कारमध्ये बसलेल्या इतर व्यक्तींपैकी कोणीही गाडीत बसताना धूम्रपान करत नाही याची काळजी घ्या.

गॅस गळती का होते?

अनेक कारणांमुळे सीएनजी कारमधून गॅस गळती होऊ शकते. ज्यामध्ये साधारणपणे फिटिंग्ज हळूहळू सैल होणे, इंधन टाकीमध्ये जास्तीचा गॅस भरणे आणि CNG किट चुकीच्या पद्धतीने बसवणे अशी कारणे आहेत.

अपघात टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अधिकृत सेवा केंद्रावर वेळोवेळी वाहनाची तपासणी करून त्यात काही दोष आढळल्यास तो त्वरित दुरुस्त करावा. मात्र, आता नवीन सीएनजी वाहनांनाही गॅस लिकेज अलर्टचे फिचर मिळू लागले आहे, ज्यामुळे कोणत्याही प्रकारची गॅस गळती तात्काळ ओळखता येईल.