अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळाने नुकतेच बारावीचे वेळापत्रक अधिकृतरित्या जाहीर केले आहे.

सध्याच्या इयत्ता १२ वीची वेळापत्रकानुसार परीक्षा घेत असताना शाळा, कॉलेज, तसेच विद्यार्थी यांच्यासमोर येणाऱ्या अडचणीचा मंडळाने विचार करणे आवश्यक आहे.

तो केला नसल्याने सदर वेळापत्रक बदलण्याची मागणी शिक्षण मंत्री नामदार वर्षा गायकवाड व राज्य बोर्डाकडे कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेने केली आहे.

इयत्ता बारावीसाठी भूगोल हा विषय कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखांना शिकविला जात असून हा विषय घेणाऱ्या परीक्षार्थीची संख्या जास्त आहे.

मागील १८ वर्षापासून हा पेपर सकाळ सत्रात घेतला जात होता. परंतु यावर्षी तो पेपर अचानक दुपार सत्रात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

पेपरचा क्रम निश्चित करताना विषयाची विद्यार्थी संख्या विचारात घेतली जात नाही. भूगोल विषयाचा पेपर उशिरा घेण्यात येत आहे. त्यामुळे सायन्स विषयाचे विद्यार्थी एका पेपरसाठी अडकून पडणार आहेत.

यामुळे याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सकाळ दुपार अशी पेपरची वेळ निश्चीत करताना त्या विषयातील परीक्षार्थीची संख्या विचारात घ्यावी.

जास्त विद्यार्थी संख्या असणारे पेपर सकाळी व कमी विद्यार्थी संख्या असणारे पेपर दुपारी जेणेकरून कमी विद्यार्थ्यांची व कमी केंद्राची गैरसोय होईल.

आज अनेक परीक्षा केंद्र हे ग्रामीण व दुर्गम भागात असून ६.३० नंतर पेपर जमा करणे, दिव्यांग असल्यास ७ वाजतात. नंतर खाजगी वाहनाने तालुक्याच्या ठिकाणी जमा करणे यासाठी बराच वेळ जातो.

त्यानंतर तेथे परिक्षकाडून पॅकिंग करून पार्सल तयार करणे या सर्व कामासाठी रात्र होते याचा विचार व्हावा. कोविडचे कारण देत मंडळाने अर्धा तास वाढीव वेळ दिला आहे.

परंतु परीक्षेस अजून दोन महिने बाकी असून त्यामध्ये सराव होणार आहे. वाढीव वेळ व एकूणच वेळापत्रक यामुळे विद्यार्थी व परीक्षा यंत्रणेवर ताण येणार येणार आहे. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्याची मागणी भूगोल परिषदेकडून सर्व विभागीय मंडळांकडेही करण्यात आली आहे.