अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- आपल्या पत्नीला सासुरवाडीतून आणायला गेलेल्या पतीला सासरच्या मंडळींनी मारहाण केली. यामुळे सदर जावयाने आत्महत्या केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गंगापूर येथे घडली होती.

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पत्नीसह सासरच्या पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पत्नी प्रगती अनिल धाकतोडे, सुगंधा नंदू तुपे, तेजस झिंझूडे तिघे रा. लोणी ता. राहाता तसेच राजेंद्र ठोकळ, मंगल राजेंद्र ठोकळ दोघे रा. राहुरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील पाचही आरोपींना राहुरी पोलिसांनी तात्काळ अटक करून गजाआड केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, या घटनेतील मयत अनिल बाळासाहेब धाकतोडे (वय 23 वर्षे, रा. धाकतोडे वस्ती, गंगापूर ता. राहुरी) यांची पत्नी प्रगती ही काही दिवसांपूर्वी तिच्या माहेरी लोणी ता. राहाता येथे गेली होती.

मयत अनिल हा तिला आणण्यासाठी लोणी येथे गेला होता. त्यावेळी त्याची पत्नी व इतर आरोपींनी त्याला मारहाण करून शिवीगाळ केली होती. तेव्हा मयत अनिल हा त्याच्या घरी परत आला. सासरकडच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून अनिलने राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुनिता बाळासाहेब धाकतोडे (वय 48 वर्षे रा. गंगापूर ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.