Chitra Wagh : भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येसाठी यवतमाळचे आमदार संजय राठोड दोषी असल्याचे आरोप केले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावर चित्रा वाघ यांनी आरोप केले होते.

मात्र आता संजय राठोड हे शिंदे गटाचे आमदार आहेत आणि शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले आहे. ठाकरे सरकारच्या काळात संजय राठोड यांच्यावर आक्रमकपणे आरोप करणाऱ्या चित्रा वाघ अचानक मवाळ झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, संजय राठोड प्रकरण आता संपवूया. त्याशिवाय महाराष्ट्रात खूप विषय प्रश्न आहेत. संजय राठोड यांच्या विरोधात लढा सुरूच राहील पण तो न्यायालयात.

तेथे माझा लढा सुरू राहील. संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारनेच क्लीन चिट दिली आहे, त्यामुळे काही प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही विचारा असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

काय प्रकरण आहे?

पूजा चव्हाण नावाच्या तरुणीने 7 फेब्रुवारी 2021 रोजी पुण्यामध्ये वानवडी परिसरात आत्महत्या केली.
पूजा चव्हाण ही टिक टॉक स्टार म्हणून प्रसिद्ध होती.
तिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांच्यावर देवेंद्र फडणवीस आणि चित्रा वाघ यांनी आरोप केला होता.
त्यानंतर संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे कथित फोन संभाषणाच्या ऑडिओ क्लिपदेखील भाजपने सादर केल्या होत्या.